Home ठळक बातम्या ‘ऑपरेशन सिंदूर’संदर्भातील शिष्टमंडळात निवड : ही जबाबदारी निष्ठा आणि ठाम भूमिकेसह पार...

‘ऑपरेशन सिंदूर’संदर्भातील शिष्टमंडळात निवड : ही जबाबदारी निष्ठा आणि ठाम भूमिकेसह पार पाडणार – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

कल्याण दि.17 मे :
पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचा संदेश जगात पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारतर्फे सर्वपक्षीय शिष्टमंडळ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये भाजप, काँग्रेस राष्ट्रवादी, जेडीयू, डीएमकेच्या ज्येष्ठ खासदारांसह शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचाही समावेश करण्यात आला आहे. ही देशसेवा करण्याची संधी आपल्याला लाभली असून ही पवित्र जबाबदारी आपण अत्यंत निष्ठा आणि ठाम भूमिकेसह पार पाडू असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. (Selection in the delegation regarding ‘Operation Sindoor’: Will carry out this responsibility with loyalty and firm stance – MP Dr. Shrikant Shinde)

संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी या संदर्भात फेसबुकवर पोस्ट शेअर केली असून “सर्वात महत्त्वाच्या क्षणी भारत एकजूट आहे. दहशतवादाच्या विरोधातील आमचा सामायिक संदेश घेऊन ७ सर्वपक्षीय शिष्टमंडळ लवकरच प्रमुख भागीदार राष्ट्रांना भेट देतील. राजकारणाच्या आणि मतभेदांच्या पलीकडे राष्ट्रीय एकतेच हे एक शक्तिशाली प्रतिबिंब असेल”, असे मंत्री किरेन रिजिजू यांनी त्यात नमूद केले आहे.

या सर्वपक्षीय सात जणांच्या शिष्टमंडळामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार शशी थरूर, भाजपाचे रविशंकर प्रसाद, जेडीयूचे संजय कुमार झा, भाजपाचे बैजयंत पांडा, डीएमकेच्या कनिमोझी करुणानिधी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ येत्या महिन्याखेरीस संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्य देशांसह प्रमुख भागीदार राष्ट्रांमध्ये जाऊन भारताची भूमिका मांडणार आहेत.

आम्ही आंतरराष्ट्रीय समुदायाला ठामपणे सांगणार आहोत की ” दहशतवादाला भारतात कोणतेही स्थान नाही आणि पाकिस्तानच आपल्या भूमीवर दहशतवादाचे पोषण करत आहे.” जेव्हा राष्ट्रीय हिताचा प्रश्न येतो, तेव्हा तिथे कोणतीही फूट नसते, तिथे असते केवळ कर्तव्य. देशाची सेवा करण्याची ही संधी मला लाभली आहे, आणि मी ही पवित्र जबाबदारी अत्यंत निष्ठा आणि भारताच्या दहशतवादाविरोधातील शून्य सहिष्णुतेच्या ठाम भूमिकेसह पार पाडणार असल्याची प्रतिक्रिया खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. तसेच ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी माझ्यावर सोपवल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आभारही मानले आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा