
कल्याण पश्चिम स्टेशन परिसरातील प्रस्तावित नव्या जागेची केली पाहणी
कल्याण दि.19 मे :
कल्याण पश्चिमेच्या स्टेशन परिसरात असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासाठी पाठीमागची प्रशस्त जागा देण्यास केडीएमसी प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून याठिकाणी आदर्श वास्तूंची निर्मिती करण्यात येईल असा विश्वास भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी व्यक्त केला.
रेल्वे स्टेशन परिसरात यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची प्रशस्त जागा होती. मात्र विविध विकासकामांसाठी ही जागा संपादित करण्यात आल्याने सध्याच्या उद्याना पाठीमागे असणारी केडीएमसी प्रशासनाची जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याला केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत तांत्रिक मुद्द्यांवर काम केल्यानंतर ही जागा देण्यात येईल असे आश्वासन दिल्याचेही खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांनी सांगितले. तर या नव्या प्रशस्त जागेवर बाबासाहेबांचा पुतळा, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा असे लहानांपासून प्रौढांपर्यंतच्या व्यक्तींसाठी उपयुक्त आणि आदर्श वास्तूची निर्मिती होऊ शकते असेही खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांनी स्पष्ट केले.
यावेळी दलित मित्र आणि रिपाईचे ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा रोकडे, माजी नगरसेवक संजय पाटील, भीमराव डोळस, कुमार कांबळे, बाळू कांबळे, भूषण तायडे यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील अनेक नेतेमंडळी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.