
सीआरआर पोर्टलची महत्त्वाची भूमिका – डीसीपी अतुल झेंडे
कल्याण दि.2 जुलै :
मोबाईल चोरीला गेल्यानंतर किंवा हरवल्यानंतर तो आपल्याला परत सापडेल किंवा पोलिसांकडून शोधून आपल्याला परत मिळाले तर. आश्चर्य वाटलं ना तुम्हाला ?पण हे खरं आहे. हरवलेले तब्बल 12 लाख रुपये किमतीचे महागडे 72 मोबाईल कल्याण परिमंडळातील पोलिसांनी शोधून काढत संबंधित मालकांकडे परत केले आहेत. त्यामुळे आपले हरवलेले हे फोन परत मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदच सर्वकाही सांगत होता. (Police return 72 lost expensive mobile phones to citizens; worth Rs 12 lakh)
कल्याण परिमंडळातील खडकपाडा, महात्मा फुले चौक, बाजारपेठ, कोळसेवाडी पोलीस ठाण्यात मोबाईल फोन हरवल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. ज्यामध्ये आयफोन, सॅमसंग, व्हिवोसारख्या महागड्या कंपन्यांच्या फोनचा समावेश होता. या घटनांचे गांभीर्य पाहता डीसीपी अतुल झेंडे यांनी यासाठी विशेष पथकांच्या माध्यमातून त्याचा तपास सुरू केला. ज्यामध्ये लोकेशन ट्रॅकिंग, तांत्रिक विश्लेषण आदी महत्त्वाच्या घटकांच्या आधारे हे हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल फोन शोधून काढले.
कल्याण पश्चिमेतील खडकपाडा पोलीस ठाण्याच्या आवारात एका कार्यक्रमाद्वारे हे 72 महागडे मोबाईल संबंधित मालकाला डीसीपी अतुल झेंडे आणि एसीपी कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ अमरनाथ वाघमोडे यांच्या हस्ते परत देण्यात आले. विशेष म्हणजे हे संबंधित व्यक्तीला परत देण्यामध्ये सीआरआर या वेबपोर्टलने महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे ज्या कोणाचा फोन हरवला असेल त्यांनी आपल्या पोलिस तक्रारीची कॉपी या पोर्टलवर अपलोड करण्याची सूचना यावेळी डीसीपी अतुल झेंडे यांनी केली. ज्यावेळेस हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल नविन सिमकार्डद्वारे ऍक्टिव्ह केल्यानंतर त्याचा मेसेज पोलीस स्टेशनसह संबंधित तक्रादारालाही प्राप्त होतो. ज्याद्वारे हरवलेला मोबाईल परत शोधून काढता येतो असेही त्यांनी स्पष्ट केले.
तर कल्याण विभागीय पोलीस ठाण्यानंतर लवकरच डोंबिवली विभागीय पोलीस ठाण्यामध्येही अशाच प्रकारचा मोबाईल हस्तांतर कार्यक्रम केला जाणार असल्याची माहितीही डी सी पी अतुल झेंडे यांनी यावेळी दिली.