
तुटलेल्या मुख्य ड्रेनेज लाईन दुरुस्तीचे काम झाले पूर्ण
कल्याण दि.3 जुलै :
कल्याण पश्चिमेतील पौर्णिमा टॉकीजसमोरील मुख्य रस्त्याखाली असणारी केडीएमसीची प्रमूख मलनिसारण वाहिनी उड्डाणपुलाच्या कामादरम्यान तूटली होती. या मलनिसारण वाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असल्याने हा रस्ता सुरू करण्यासाठी आणखी 5-6 दिवसांचा कालावधी लागणार असल्याची माहिती केडीएमसी जलनिसारण – मलनिसारण विभागाचे कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ यांनी दिली आहे.
एमएमआरडीएच्या माध्यमातून विठ्ठलवाडी – शहाड उड्डाणपूल बांधण्यात येत असून त्यासाठी पौर्णिमा टॉकीज येथील सिमेंट काँक्रीटचा रस्ता खोदण्यात आला आहे. त्यावेळी या रस्त्याखाली असणारी संपूर्ण शहराची मुख्य मलवाहिनी तूटून मुख्य रस्त्यावर हे ड्रेनेजमधून हे दुर्गंधीयुक्त पाणी पसरले होते. परिणामी या परिसरातील दुकानदार आणि स्थानिक रहिवाशांना गेल्या 15 दिवसांपासून त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता.
त्यामुळे स्थानिकांनी केलेल्या तक्रारीनंतर केडीएमसी जनि – मनि विभागातर्फे ही मुख्य मलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. परंतु मुख्य मलवाहिनी असल्याने पाण्याचा असलेला मोठा प्रवाह, महानगर गॅससह इलेक्ट्रिक वाहिन्याही असल्याने अतिशय काळजीपूर्वक ही दुरुस्तीकाम सुरू होते अशी माहिती जलनिसारण – मलनिसारण विभागाचे कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ यांनी दिली. तसेच या दुरुस्ती कामासाठी पौर्णिमा टॉकीज येथून प्रेम ऑटोकडे जाणारी एक मार्गिका बंद ठेवण्यात आली होती. तर ही तुटलेली मलवाहिनी तिथल्याच दुसऱ्या एका मलवहिनीला जोडण्याचे काम आता पूर्ण झाले असले तरी इथला मुख्य सिमेंट काँक्रीटचा रस्ता खोदण्यात आला आहे. हा रस्ता पूर्ववत करण्यासाठी आणखी 5-6 दिवसांचा कालावधी लागणार असून तोपर्यंत नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही नवांगुळ यांनी केले आहे.
दरम्यान या मुख्य मलवाहिनीच्या कामासाठी सिमेंट काँक्रीटचा रस्ता खोदण्यात आल्याने तो वाहतुकीसाठी तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. इथली वाहतूक पौर्णिमा टॉकीज चौकातून इंदिरा नगर -बिर्ला कॉलेज मार्गे वळवण्यात आली होती. मात्र हा रस्ता छोटा असल्याने आणि या मार्गावर असणारी वाहनांची प्रचंड संख्या पाहता याठिकाणी अतिशय संथ गतीने सुरू होती. ज्याचा वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. मात्र आता मलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने येत्या आठवड्याभरात हा रस्ता सुरू होणार असल्याने नागरिकांनी तोपर्यंत सहकार्य करण्याचे आवाहन केडीएमसीने केले आहे.