Home ठळक बातम्या कल्याण पश्चिमेत एका व्यक्तीचा संशयित डेंग्यूने मृत्यू ; मनसेचा केडीएमसी प्रशासनाविरोधात संताप

कल्याण पश्चिमेत एका व्यक्तीचा संशयित डेंग्यूने मृत्यू ; मनसेचा केडीएमसी प्रशासनाविरोधात संताप

केडीएमसी आरोग्य विभागाकडून नागरिकांना दक्षता बाळगण्याचे आवाहन

कल्याण दि.10 जुलै :
कल्याण डोंबिवलीमध्ये एकीकडे व्हायरल तापाने शेकडो जण फणफणले असतानाच कल्याण पश्चिमेतील एका व्यक्तीचा संशयित डेंग्यूने मृत्यू झाल्याची माहिती केडीएमसी आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. वाढत्या साथीच्या आजारांच्या या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दक्षता बाळगण्याचे आवाहन केडीएमसी आरोग्य विभागाने केले आहे. दरम्यान केडीएमसी प्रशासनाकडून हलगर्जीपणा झाल्याचा आरोप करत मनसेने महापालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलन केले. (A person dies of suspected dengue in Kalyan West; MNS expresses anger against KDMC administration)

कल्याण पश्चिमेच्या बेतुरकर पाडा येथील 31वर्षीय व्यक्तीला उपचारासाठी 7 जुलै रोजी महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असूनही त्याच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नसल्याने डॉक्टरांनी त्याला सायन रुग्णालयात संदर्भित करण्याचा सल्ला दिला. परंतू रुग्णाच्या नातेवाईकांनी त्याला काल संध्याकाळी ८.०० वाजता खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी उपचारादरम्यान त्याचा आज मृत्यू झाल्याची माहिती केडीएमसी आरोग्य विभागाने दिली आहे. तसेच या रुग्णाचा संशयित डेंग्युने मृत्यु झाल्याचेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कल्याण शहर मनसेने आक्रमक पवित्रा घेत केडीएमसी मुख्यालयात आंदोलन करत आपला संताप व्यक्त केला. केडीएमसी प्रशासन शहरातील नागरिकांबाबत अत्यंत असंवेदनशील असून त्यांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी यावेळी केला.

साथीच्या आजार झालेल्या रुग्णांवर शास्त्रीनगर रुग्णालय आणि बाई रुक्मिणीबाई रुग्णालय कल्याण, ४ दवाखाने आणि २६ नागरी आरोग्य केंद्रांतील ओपीडी, आरोग्यवर्धिनी केंद्रे, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, आपला दवाखाना येथील ओपीडीमध्ये येणा-या रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.

बांधकामाच्या ठिकाणी साचलेल्या आणि साठवलेल्या पाण्यात डासअळीची वाढ होणार नाही याची दक्षता घेणेबाबत संबधित बांधकाम व्यावसायिकास बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच डासअळी प्रतिबंधक कार्यवाही न करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकास नोटीसही बजावण्यात आल्याचे केडीएमसीकडून सांगण्यात आले आहे.

तर शहरातील सर्व सोसायट्या, गृहनिर्माण संस्थांना बिल्डींगच्या टेरेस आणि परिसरातील टायर, फुटकी भांडी येथे पाणी साचुन राहणार नाही, तसेच बिल्डींग आणि जमिनीमधील पाण्याची टाकी इत्यादींवर घट्ट झाकणे बसवण्यांत यावीत, कोठेही पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घेणेबाबत नोटीस देण्यात आल्याचेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

याशिवाय साथीच्या आजारांची वाढती संख्या लक्षात घेता कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रात बांधकाम बंद असलेल्या साईट्सवर साचलेल्या पाण्याद्वारे डासाच्या आळ्यांची निर्मिती होऊन आजारात वाढ न होण्यासाठी संबंधित स्वच्छता निरीक्षक यांना सुचना देण्यात आल्या आहेत. याठिकाणी धुरावणी, फवारणी, आईलिंग आणि इतर प्रतिबंधात्मक कार्यवाही केली जात असल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दिपा शुक्ल यांनी दिली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा