
औचित्याच्या मुद्द्याद्वारे अधिवेशनात मांडला प्रश्न
कल्याण दि.18 जुलै :
उल्हास नदीवर वडवली – कल्याणला जोडणारा ब्रिटिशकालीन उड्डाणपूल अतिशय जीर्ण झाला असून मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी त्याठिकाणी नविन पुलाची उभारणी करण्याची मागणी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली आहे. राज्याच्या पावसाळी अधिवेशनात आमदार भोईर यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे हा गंभीर प्रश्न मांडत त्याकडे शासनाचे लक्ष वेधले आहे. (Build a new flyover at Vadavali over Ulhas river before a major accident occurs – MLA Vishwanath Bhoir demands)
उल्हास नदीवरील वडवली हा ब्रिटिशकालीन उड्डाणपुलावरून सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे दोन गाड्या समोरासमोर आल्यानंतर याठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होते. काही दिवसांपूर्वीच पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याने निष्पाप लोकांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असून त्यामुळे या पुलावरून जाणाऱ्या नागरिकांमध्येही असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याची माहिती आमदार विश्वनाथ भोईर यांनी सभागृहाला दिली.
कल्याण शहर आणि टिटवाळा परिसरात असणारे सर्व गावे यांना जोडण्याचं काम हा उड्डाणपूल करत करत आहे. मात्र ब्रिटिशांच्या काळात त्याची निर्मिती झाल्याने आता हा उड्डाणपूल रहदारीसाठी धोकादायक बनला आहे. पावसाळ्यात तर या उड्डाणपुलाची अवस्था अतिशय बिकट होऊन जाते. मुसळधार पावसामुळे नदीपात्रातील पाण्यामध्येही वाढ होत असल्याने बऱ्याचदा खालून वाहणारे नदीचे पाणी रस्त्यावर उसळून येत असल्याचेही आमदार भोईर यांनी यावेळी सांगितले.
तर याठिकाणी नविन उड्डाणपूल बांधणार असल्याचे आश्वासन महापालिका आणि एमएमआरडीएकडून गेल्या अनेक वर्षांपासून मिळत आहे. आपल्या आमदारकीला आता सहा वर्षे झाली परंतु अद्याप या नवीन उड्डाणपूलाचे काम सुरू झालेले नसल्याचेही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
या सर्व गोष्टींचा विचार करता कोणतीही मोठी दुर्घटना होण्याच्या अगोदर याठिकाणी नवीन उड्डाणपुलाची निर्मिती करण्याची आग्रही मागणी आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी राज्य सरकारकडे केली आहे.