
(फाईल फोटो)
ट्रॅफिक डीसीपींकडून पुढील महिन्याभरासाठी अधिसूचना जारी
कल्याण दि.26 जुलै :
वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या कल्याण पश्चिमेतील ही कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या डीसीपींकडून एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार कल्याण पश्चिमेतील सर्वात व्यस्त चौकांपैकी एक असलेल्या सहजानंद चौकातील वाहतुकीमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.
कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौक हा अतिवर्दळीचा रस्ता असुन याठिकाणी संतोषी माता रोड, आग्रा रोड, अहिल्याबाई चौकाकडे जाणारा रोड, काळा तलाव आणि काळी मशिदीकडे जाणारा असे एकुण 6 रस्ते एकत्र येतात. त्यापैकी सहजानंद चौकाकडुन संतोषी माता रोडमार्गे रामबागकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी असल्याने याठिकाणी वाहतूक कोंडी होत असते. या पार्श्वभूमीवर सहजानंद चौकात वाहतूक कोंडी होऊ नये आणि परिसरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्याकडून हे बदल करण्यात आले आहेत.
प्रवेश बंद :
१) सहजानंद चौकातून संतोषी माता रोडमार्गे रामबागकडे जाणाऱ्या वाहनांना सहजानंद चौक येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग-
त्याऐवजी मकबरा चौक येथे वळून ही वाहने ही सहजानंद चौक मकबरा रोडने पुढे जावुन साती आसरा मंदिरमार्गे वळण घेवुन पुढे संतोषी माता चौक येथुन रामबागकडे जाऊ शकतील.
प्रवेश बंद
२)- चिकण घरकडुन काळा तलावमार्गे सहजानंद चौककडे येणाऱ्या वाहनांना साती आसरा मकबरा चौक येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग
त्याऐवजी ही वाहने साती आसरा – मकबरा चौकमार्गे डावे वळण घेवुन संतोषी माता चौकमार्गे इच्छित स्थळी जाऊ शकतील.
एकदिशा मार्ग (वन वे)
संतोषी माता चौक (कल्याण पोळी भाजी केंद्र) ते सहजानंद चौक मार्ग हा रामबागकडुन संतोषी माता रोडमार्गे सहजानंद चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना एकदिशा मार्ग करण्यात येत आहे.
तसेच ही अधिसुचना मंजूर दिनांकापासून ३० दिवस प्रायोगिक तत्वावर लागु करण्यात येत असल्याचेही वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे
तसेच या अधिसुचनेबाबत काही हरकती अगर सुचना लेखी स्वरुपात पोलीस उप आयुक्त, शहर वाहतुक शाखा, कार्यालय,तीन हात नाका,एल.बी.एस. मार्ग,ठाणे-४००६०२ येथे प्राप्त झाल्यास त्या विचारात घेवून अधिसूचना कायम करण्याबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल.
तर ही वाहतूक नियंत्रण अधिसुचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही.