Home ठळक बातम्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर शांतीदूत गृहनिर्माण सोसायटी सदस्यांचे आमरण उपोषण स्थगित

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर शांतीदूत गृहनिर्माण सोसायटी सदस्यांचे आमरण उपोषण स्थगित

पुढील कॅबिनेटनंतर तातडीने बैठक लावून न्याय मिळवून देण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

कल्याण दि.6 ऑगस्ट :
विकासकावरील कायदेशीर कारवाईच्या मागणीसाठी गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेले शांतीदूत गृहनिर्माण हौसिंग सोसायटीच्या सभासदांचे आमरण उपोषण आज स्थगित करण्यात आले. पुढील कॅबिनेटनंतर तातडीने याविषयी बैठक लावून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने आम्ही हे आमरण उपोषण तूर्तास स्थगित करत असल्याची माहिती माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली. कालच्या कॅबिनेट बैठकीनंतर याप्रश्नी आमदार किसन कथोरे आणि आमदार महेश चौगुले यांनी भेट घेतल्यानंतर त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले.

कल्याण पश्चिमेच्या चिकनघर येथील शांतीदूत गृहनिर्माण हौसिंग सोसायटीचे सभासद गेल्या 14 वर्षांपासून आपली हक्काची घरे मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. हा पुनर्विकास प्रकल्प राबवणाऱ्या विकासक श्रीकांत शितोळे आणि चेतन सराफ या विकासकांवरील कायदेशीर कारवाईच्या मागणीसाठी शांतीदूत गृहनिर्माण हौसिंग सोसायटीच्या सभासदांनी गेल्या रविवार 3 ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू केले होते. ज्यामध्ये भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार हेदेखील सहभागी झाले. आज या आंदोलनाचा तिसरा दिवस होता आणि आंदोलकांनी पाण्याचा एक थेंबही न घेतल्यामुळे नरेंद्र पवार यांच्यासह उपोषणकर्त्या आंदोलकांची तब्येतही खालावली होती. नरेंद्र पवार यांच्यासह आंदोलनाला बसलेल्या इतर सभासदांना चक्कर येण्याचा त्रास होऊ लागला मात्र त्यानंतरही या सर्वांनी वैद्यकीय उपचारांना नकार दिला. त्यामुळे हे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती. या आंदोलनाला विविध सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेतेमंडळींकडूनही पाठिंबा मिळत असल्याचे दिसून आले.

दरम्यान या आंदोलनाची माहिती मिळताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक पळसकर, भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय नेते विनोद तावडे, माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आदींनी माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच त्यांच्याकडून या आंदोलनाची सर्व माहितीही घेतल्याने याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पातळीवर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

आमदार किसन कथोरे आणि महेश चौगुले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट… 

या पार्श्वभूमीवर मुरबाडचे आमदार किसन कथोरे आणि भिवंडीचे आमदार महेश चौगुले यांनी कालच्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आंदोलनाची तसेच उपोषणकर्त्यांच्या खालावलेल्या तब्येतीची माहिती दिली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्षणाचाही विलंब न करता पुढील कॅबिनेटनंतर तातडीने याप्रकरणी बैठक लावून न्याय मिळवून देण्याचे ठोस आश्वासन आमदार कथोरे आणि आमदार चौगुले यांच्यामार्फत आम्हाला दिल्याची माहिती नरेंद्र पवार यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याशीही आमदार किसन कथोरे आणि आमदार महेश चौगुले यांनी संपर्क साधला असता चव्हाण यांनी येत्या रविवारी यासंदर्भात बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामध्ये कायदेशीर आणि प्रशासकीय स्तरावर आवश्यक असलेली कार्यवाही केली जाईल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक घेऊन हा प्रश्न तडीस नेण्याचे आश्वासन रविंद्र चव्हाण यांच्याकडून मिळाल्याने आम्ही हे उपोषण तात्पुरते स्थगित केल्याचे नरेंद्र पवार यांनी सांगितले. (Fast-unto-death of Shantidoot Housing Society members suspended after assurance from Chief Minister Devendra Fadnavis)

तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत याप्रश्नी समाधानकारक तोडगा न निघाल्यास नाईलाजास्तव पुन्हा एकदा उपोषणाला बसावे लागेल. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास असून त्यांच्याकडून आम्हाला पूर्णपणे न्याय मिळेल अशी प्रतिक्रियाही माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा