
तर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
कल्याण दि.6 ऑगस्ट :
शासकीय धोरणात्मक त्रुटींमुळे शांतीदूत गृहनिर्माण हौसिंग सोसायटीच्या पुनर्विकास प्रकल्पाला विलंब झाला असला तरी आवश्यक असणाऱ्या सर्व आर्थिक आणि कायदेशीर परवानग्या आम्हाला प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे रखडलेला हा गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करून त्यातील सभासदांसह इतरांनाही आम्हीच घरे देऊ अशी ग्वाही टायकून ग्रुपचे विकासक श्रीकांत शितोळे यांनी दिली आहे. माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सभासदांसह सुरू केलेल्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर विकासक श्रीकांत शितोळे यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकल्पाला झालेल्या विलंबाची आणि प्रकल्पाची सद्यस्थिती याबाबत सविस्तर माहिती दिली. (Delays due to government policy errors, but we will complete the Shantidoot project and provide houses – Tycoon Group developer Shrikant Shitole assures)
कल्याण पश्चिमेतील चिकणघर येथील शांतीदूत गृहनिर्माण हौसिंग प्रकल्प गेल्या 14 वर्षांपासून रखडलेला असल्याने त्यातील 184 सभासदांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकल्पाला झालेला विलंब आम्ही मान्य करतो, मात्र काही गोष्टी विकासकाच्या हातात नसतात, काही तांत्रिक आणि शासकीय बाबींमुळे हा विलंब झाला. विशेषतः अपेंडिक्स एसची परवानगी मिळण्यात मोठा कालावधी गेला आणि त्यातूनच मग या प्रकल्पाला विलंब झाल्याची माहिती श्रीकांत शितोळे यांनी यावेळी दिली.
तर वित्तसंस्थांकडून प्राप्त झालेल्या अर्थपुरवठ्यात कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झाला नसून सभासदांचे 111 महिन्याचे भाडे, शासकीय परवानग्या, विकासक म्हणून कर आदी प्रमूख गोष्टींसाठी हा निधी खर्च झाला आहे. आणि आमच्याकडे या सर्व खर्चाचे लेखी पुरावे असून त्यासंदर्भात होणारे आरोप हे तथ्यहीन असल्याचे त्यांनी सांगितले.
या संपूर्ण प्रकरणाबाबत लोकांमध्ये संभ्रम पसरवला जात आहे. उपोषणाला बसलेल्या लोकांबद्दल आम्ही संवेदनशील आहोत. त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेले गैरसमज दूर करण्यासाठी त्यांनी एकदा तरी आम्हाला येऊन भेटावे आणि चर्चा करावी. तर यापूर्वीच माजी आमदार नरेंद्र पवार यांचीही आपण भेट घेऊन यासंदर्भातील वस्तुस्थिती समजावून सांगितली असल्याचेही शितोळे म्हणाले.
तर शांतीदूत गृहनिर्माण हौसिंग सोसायटीतील सभासदांच्या 12 पैकी 11 संघटना या पूर्णपणे आमच्यासोबत असून त्यांनी आमच्यावर पूर्ण विश्वास दाखवलेला आहे. आम्ही विरोधात गेलेल्या त्या एका संघटनेलाही आवाहन करतो की आमच्यासोबत एकदा बसा आणि वस्तुस्थिती समजावून घ्या. कारण आताच्या घडीला आवश्यक असणाऱ्या आर्थिक आणि कायदेशीर अशा सर्व प्रकारच्या परवानग्या आम्हाला प्राप्त झाल्या असून काही गोष्टी अंतिम टप्प्यात आल्या आहेत. येत्या काही महिन्यात या सर्व गोष्टी मार्गी लागतील आणि प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू होईल असे सांगतानाच हा प्रकल्प आम्हीच पूर्ण करणार आणि लोकांना घरेही आम्हीच देणार असा ठाम विश्वासही शितोळे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.