Home ठळक बातम्या कल्याणहून शिवाजीनगरला जाणाऱ्या एसटी बसचे पुढचे चाक निखळले ; मोठा अपघात टळला

कल्याणहून शिवाजीनगरला जाणाऱ्या एसटी बसचे पुढचे चाक निखळले ; मोठा अपघात टळला

 

कल्याण दि.11ऑगस्ट :
कल्याणहून माळशेजमार्गे शिवाजी नगरला जाणाऱ्या एसटी बसचे चाक निखळून अपघात झाल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात सर्व सुखरूप असून सुदैवाने मोठा अपघात टळला आहे. एसटी बसच्या पुढच्या चाकाचे बेअरिंग तुटल्यामुळे या गाडीचे चाक बाहेर आल्याची माहिती कल्याण एसटी आगाराचे व्यवस्थापक एम. बी. भोये यांनी दिली.

आज सकाळी कल्याण डेपोतून 8.15 मिनिटांच्या सुमारास ही एसटी बस माळशेज मार्गे शिवाजी नगर येथे जात होती. तर दोन दिवसांपूर्वी झालेले रक्षाबंधन आणि काल असणारा रविवार पाहता या बसमध्ये प्रवाशांचीही मोठी गर्दी होती. कल्याण मुरबाड मार्गावर गोवेली – मामनोली दरम्यान ही बस आली असताना अचानक या बसचे चालकाच्या बाजूकडील चाक निखळून पडले. आणि एका बाजूने बस अचानक खाली बसली. ही बस प्रवाशांनी भरलेली असल्याने बस एका बाजूने खाली कलंडताच आतील प्रवासी एकमेकांवर आदळल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

या अपघातात काही प्रवाशांना मुका मार लागल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच हा अपघात नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. एसटी बसमधील तांत्रिक बिघाडामुळे झाले की रस्त्यांच्या खराब अवस्थेमुळे हा अपघात झाला याबाबत आताच काही सांगता येणार नाही.

मात्र या अपघातानंतर बसमधील प्रवाशांनी एसटी चालक आणि कंडक्टर यांना घेराव घालत याबाबत संतप्त जाब विचारला. इतक्या प्रवाशांनी भरलेली बस चालवण्याआधी तुम्ही तपासली नाही का? आमच्या जीवाचे काही बरे वाईट झाले असते तर त्याला कोण जबाबदार? अशा शब्दांत प्रवाशांनी आपला संताप व्यक्त केला.

यासंदर्भात कल्याण एसटी आगाराचे व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की या बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असून या घटनेची माहिती मिळताच दुसरी एसटी गाडी पाठवून त्यांना पाठवण्याची व्यवस्था केली. तसेच या बसचे टायर आणि नटबोल्ट एकदम व्यवस्थित असून बेअरिंग कोरडे पडल्याने हा अपघात झाल्याची माहितीही एम. बी. भोये यांनी दिली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा