Home ठळक बातम्या भाजपवर वोटचोरीचा आरोप करत कल्याणात निघाला काँग्रेसचा कॅन्डल मार्च

भाजपवर वोटचोरीचा आरोप करत कल्याणात निघाला काँग्रेसचा कॅन्डल मार्च

 

कल्याण दि.14 ऑगस्ट :
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपकडून मोठ्या प्रमाणात मतांची चोरी झाल्याचा आरोप करत त्याच्या विरोधात कल्याणमध्ये जिल्हा काँग्रेसतर्फे आज कॅन्डल मार्च काढण्यात आला. (Congress takes out candle march in Kalyan, accusing BJP of vote-rigging)

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत मतदार यादीमध्ये घोळ असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगावर दबाव टाकून त्यांच्या मदतीने मतदार यादीमध्ये फेरफार करून मतांची चोरी करत ही सत्ता मिळवल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. याविरोधात संपूर्ण देशभरात स्थानिक पातळीवर आंदोलन छेडण्याचे निर्देश राहुल गांधी यांनी दिले असून कल्याण काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली आज कल्याणात कॅन्डल मार्च काढण्यात आला. कल्याण स्टेशन परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत हा मार्च काढण्यात आला. यावेळी हातामध्ये मशाल घेऊन आणि सत्ताधारी पक्षाविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

यामध्ये प्रदेश सरचिटणीस ब्रिज दत्त, नविन सिंग, महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी, काँग्रेस कमिटी सदस्य मुन्ना तिवारी, ज्येष्ठ पदाधिकारी राजाभाऊ पातकर, अल्पसंख्यांक विभागाचे शकील खान, युवक काँग्रेसचे जपजित सिंग यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत जे दाखले दिले त्याचा अर्थ नरेंद्र मोदी हे वोटचोरी करून देशाचे पंतप्रधान झाले असून या वोट चोरीमुळे देशाची वाट लागली असल्याचा आरोप यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी केला. तसेच येणाऱ्या महापालिका निवडणुकीत अशा प्रकारची वोट चोरी आम्ही होऊन देणार नाही आणि याहीपेक्षा जोरदार आंदोलन आम्ही करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा