
कल्याण दि.15 ऑगस्ट :
आपल्या देशाची वाटचाल ही नॉर्थ कोरियाप्रमाणे हुकुमशाहीकडे सुरू असल्याची टिका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने 15 ऑगस्टसाठी लागू केलेल्या मांस विक्री बंदीच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी ते आज कल्याणात आले होते. त्यावेळी येथील जय मल्हार उपहारगृहात झालेल्या काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या स्नेहभोजन कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी हे भाष्य केले. (Decision to ban meat sale: The country is moving towards a dictatorship like North Korea – NCP leader Jitendra Awhad criticizes)
केडीएमसी प्रशासनाने 15 ऑगस्टसाठी लागू केलेल्या मांस विक्री बंदीच्या निर्णयावरून प्रचंड राजकीय गदारोळ सुरू झालाय. कल्याण, मुंबईपासून ते थेट दिल्लीच्या राजकीय वर्तुळातून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. तसेच कल्याणातील खाटिक समाज आणि काँग्रेस पक्षाकडून आज सकाळी त्याविरोधात केडीएमसी मुख्यालयाबाहेर आंदोलनही करण्यात आले. याच निषेधात्मक आंदोलनाचा भाग म्हणून कल्याण जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या पुढाकाराने मांसाहारी स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील जय मल्हार या उपहारगृहात झालेल्या या कार्यक्रमाला काँग्रेससह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शासन आणि प्रशासनावर सडकून टिका केली. आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन असून कोणी काय खावं आणि काय नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तीक प्रश्न आहे. नॉर्थ कोरियामध्ये तेथील हुकुमशहा किम उन जोंग यांनी दिलेल्या केस कापण्याच्या निर्णयाची तुलना त्यांनी यावेळी केडीएमसीच्या मांसविक्री बंदीच्या निर्णयाशी केली. तसेच देशाची वाटचाल ही अशीच हुकुमशाहीकडे सुरू असल्याचे सांगत स्वातंत्र्यदिनीच नागरिकांच्या हक्कावर गदा आणण्याच्या या प्रवृत्तीचा तीव्र शब्दांत निषेध केला. तर केडीएमसी आयुक्त हे भाजपच्या इशाऱ्यावर काम करत असून त्यामुळेच अशाप्रकारचे निर्णय घेत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, प्रदेश सरचिटणीस नविन सिंग, ज्येष्ठ पदाधिकारी राजाभाऊ पातकर, महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी, युवक काँग्रेसचे जपजित सिंग यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.