Home ठळक बातम्या सहजानंद चौकातील वाहतूक बदलांबाबत ट्रॅफिक डीसीपी लवकरच पाहणी करणार – माजी सभागृह...

सहजानंद चौकातील वाहतूक बदलांबाबत ट्रॅफिक डीसीपी लवकरच पाहणी करणार – माजी सभागृह नेता श्रेयस समेळ

शेकडो नागरिकांच्या हरकती ट्रॅफिक डीसीपींना समेळ यांनी केल्या सादर

कल्याण दि.17ऑगस्ट :
कल्याण पश्चिमेतील कोंडी सोडवण्यासाठी सहजानंद चौकात लागू करण्यात आलेल्या वाहतूक बदलांबाबत ट्रॅफिक डीसीपी पंकज शिरसाट हे लवकरच पाहणी करणार असून नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती माजी सभागृह नेते श्रेयस समेळ यांनी दिली आहे. या वाहतूक बदलांबाबत श्रेयस समेळ यांनी ठाणे वाहतूक शाखेचे डी सी पी शिरसाट यांची भेट घेत स्थानिक नागरिकांच्या असणाऱ्या हरकती आणि सूचना त्यांच्याकडे सुपुर्द केल्या. (Traffic DCP will soon inspect the traffic changes at Sahajanand Chowk – Former House Leader Shreyas Samel)

कल्याण पश्चिमेतील एक प्रमुख चौक असलेल्या सहजानंद चौकातील होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून ही नवी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मात्र या वाहतूक बदलांमुळे संतोषी माता रोड, काळा तलाव परिसराच्या अंतर्गत भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी सुरू झाली आहे. त्यामुळे या भागात राहणाऱ्या स्थानिक नागरिकांसह श्रेयस समेळ यांनीही या वाहतूक बदलांना विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी समेळ यांनी स्थानिक नागरिक, व्यापारी, हौसिंग सोसायटी, जागरूक नागरिक यांनी नोंदवलेल्या हरकती आणि सूचना घेऊन ट्रॅफिक डीसीपी शिरसाट यांची भेट घेत त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगितली. तसेच नागरिकांना होणारा त्रास पाहता ही अधिसूचना तातडीने रद्द करण्याची मागणीही त्यांनी या भेटीदरम्यान केली.

त्यावर येत्या आठवड्यात आपण स्वतः कल्याणात भेट देऊन सहजानंद चौकातील या वाहतूक बदलांची पाहणी करू आणि त्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करू असे आश्वासन ट्रॅफिक डीसीपी यांनी दिल्याचे समेळ यांनी सांगितले. तर या वाहतूक कोंडीच्या विषयाकडे केवळ आणि केवळ नागरी समस्या म्हणून बघणे गरजेचे असून त्याला कोणत्याही प्रकारचे राजकीय वळण देण्याची गरज नसल्याचेही समेळ यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे ट्रॅफिक डीसीपींच्या या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा