Home ठळक बातम्या पावसाचे अपडेट्स; 24 तासांत कल्याण डोंबिवलीत झालाय इतका पाऊस; सखल भागात पूरसदृश्य...

पावसाचे अपडेट्स; 24 तासांत कल्याण डोंबिवलीत झालाय इतका पाऊस; सखल भागात पूरसदृश्य परिस्थिती

फोटो सौजन्य: आकाश कांबळे, एलएनएन सिटीझन रिपोर्टर

बारवी धरणातील विसर्ग- मुसळधार पावसामुळे कल्याण डोंबिवलीतील किनारी आणि सखल भाग जलमय

कल्याण डोंबिवली दि.20. ऑगस्ट :
हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यावर कालपासून ठाणे जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. एकीकडे मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे बारवी धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग यामुळे कल्याण डोंबिवलीत ठिकठिकाणी खाडी आणि नदीकिनारच्या भागामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. पावसाच्या आकडेवारीचा विचार करता गेल्या 24 तासांत कल्याण डोंबिवलीत 172.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. (Rain updates; Kalyan Dombivali has received so much rain in 24 hours; Flood-like situation in low-lying areas)

कल्याण डोंबिवली आणि आसपासच्या परिसराला कालपासूनच पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. त्यातच बारवी धरणही पूर्ण क्षमतेने भरले असून त्याच्या अकरा दरवाजांमधून तब्बल 236 क्युसेक इतका प्रचंड वेगाने पाणी बाहेर पडत आहे.

परिणामी एकीकडे मुसळधार आणि दुसरीकडे बारवी धरणाचे पाणी उल्हास नदीद्वारे कल्याणच्या नदीकिनारी असलेल्या वालधुनी, योगीधाम, रिंगरोड अशा अनेक सखल भागात शिरले आहे. तर पुढे हेच पाणी कल्याण खाडीलाही जाऊन मिळत असल्याने दुर्गाडी गणेश घाट, रेतीबंदर परिसर जलमय झाला. त्यासोबतच शहाड मोहने, योगीधाम, गौरीपाडा सिटी पार्क, भवानी नगर, कल्याण पूर्वेतील अशोक नगर, छत्रपती शिवाजी महाराज नगर, वालधुनी परिसरातील अनेक चाळी आणि घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले.

मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शिरल्याने पाणीपुरवठा खंडीत…

उल्हासनदी पात्रातील पाणी केडीएमसीच्या मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात शिरल्याने खबरदारीची उपाय म्हणून पहाटे ३ वाजल्यापासून पंपिंग स्टेशन बंद करण्यात आले आहे. जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी ओसरल्यानंतर पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे. परिणामी संपूर्ण अ प्रभाक्षेत्र, ब प्रभाक्षेत्राचा काही भाग आणि जे प्रभाग क्षेत्रातील अशोक नगर, शिवाजीनगर वालधुनी या परिसराचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. तसेच काळू नदीवरील टिटवाळा जॅकवेलमध्ये ही पाणी आल्याने टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्र सकाळी ८.३० वाजेपासून बंद करण्यात आले आहे. मात्र जलशुद्धीकरण केंद्रात कुठलाही बिघाड झालेला नसून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

तर रायते पुलावरून पाणी वाहू लागल्याने काल रात्रीपासून बंद असणारा कल्याण – मुरबाड मार्ग आजही बंदच आहे. त्यातच याला पर्यायी असणारा टिटवाळा – रायते मार्गही पाण्याखाली गेल्याने हा मार्गही बंद झाल्याने अनेकांचे मोठे हाल झाल्याचे पाहायला मिळाले.

24 तासांतील पावसाची आकडेवारी

कल्याण डोंबिवली – 172.6 मिलिमीटर
ठाणे – 196.9
मुरबाड – 122
भिवंडी – 179
शहापूर- 126
उल्हासनगर – 222
अंबरनाथ – 141

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा