
महापालिकेच्या विद्युत विभागामार्फत आज अक्षय ऊर्जा दिन संपन्न
कल्याण दि.20 ऑगस्ट :
अक्षय ऊर्जेचा वापर ही काळाची गरज आहे, आपल्या घराच्या छतावर सौर ऊर्जा सयंत्रे,तसेच महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी ऊर्जा कार्यक्षम एलइडी लाईट, फॅन आणि 5 स्टार रेटिंग घरगुती विज उपकरणाचा वापर करून ऊर्जा बचत करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी केले. महापालिकेच्या विद्युत विभागामार्फत महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात अक्षय ऊर्जा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. (Renewable Energy Day; Use of renewable energy is the need of the hour – Municipal Commissioner Abhinav Goyal)
नागरीकांनी आपल्या घरी, आपल्या कार्यालयात जास्तीत जास्त सोलार एनर्जीचा म्हणजे, हरित ऊर्जेचा वापर करावा. आपल्या घरात एलईडी लाईट्स , २८ वॅट क्षमतेचे बीएलडीसी फॅनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने ऊर्जेची बचत होईल. अनेक दुर्घटना आज ग्लोबल वार्मिंगमुळे होत आहेत. अशा वेळी हरित ऊर्जेचा (अक्षय ऊर्जेचा) वापर केल्यामुळे, पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम टाळण्यास नक्कीच मदत होईल आणि “ग्रीन एनर्जी-क्लिन सिटी” साठी आपल्याला आणखी एक पाऊल पुढे टाकता येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
भारतात 58% विद्युत निर्मिती कोळशापासून होते. या प्रक्रियेत कार्बन डॉय ऑक्साईड या घातक वायुची निर्मिती होत असल्यामुळे, नेहमी हरित ऊर्जेचा म्हणजे अक्षय ऊर्जेच्या वापरास प्राधान्य दिले पाहिजे , अशी माहिती विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी यावेळी दिली.
या कार्यक्रमात महापालिकेच्या विद्युत विभागामार्फत, “महापालिकेने सौर ऊर्जा क्षेत्रात केलेली भरीव कामगिरी” या पुस्तिकेचे तसेच हस्तपत्रकांचे, जनजागृतीपर फलकाचे अनावरण महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांचे हस्ते करण्यात आले. यावर्षीच्या श्री गणेशोत्सवात सर्व विसर्जन स्थळी या हस्तपत्रकांच्या माध्यमातून अक्षय ऊर्जेबाबत जनजागृती केली जाईल, अशीही माहिती विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी यावेळी दिली.
या समयी विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांमार्फत अक्षय ऊर्जा, सोलार एनर्जीचा वापर या संदर्भात एका लघु नाटक सादरीकरण करून अक्षय ऊर्जाबाबत उपस्थित महापालिका अधिकारी, कर्मचारी व नागरीक यांना माहिती देण्यात आली.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे विद्युत निरीक्षक भुषण मानकामे, महापालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी, उपआयुक्त संजय जाधव, कांचन गायकवाड, विद्युत विभागाचे उप अभियंता भागवत पाटील , जितेंद्र शिंदे , इतर अधिकारी व विद्युत विभागातील कर्मचारी वर्ग उपस्थित होता.