
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार’ मार्फत क्रिकेट सामन्यांचे आयोजन
डोंबिवली दि.7 डिसेंबर :
‘डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार’ यांच्या वतीने आयोजित आणि ‘मराठी सेलिब्रेटी क्रिकेट लीग (MCCL)’ अंतर्गत ‘डोंबिवलीकर चषक’ या भव्य सेलिब्रेटी क्रिकेट स्पर्धेला मराठी कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आयोजक रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. कल्याण-डोंबिवली शहरात पहिल्यांदाच आयोजित होत असलेल्या या स्पर्धेमुळे शहराला वेगळंच ग्लॅमर प्राप्त झाल्याचे दिसून आले. (Marathi Celebrity Cricket League: 80 Renowned Artists From the Marathi Entertainment Industry Set to Battle on the Cricket Field)
या स्पर्धेची सर्वात मोठी खासियत म्हणजे, मराठी मनोरंजन विश्वातील ८० प्रतिष्ठित कलाकार थेट मैदानात उतरून एकमेकांना मैत्रीपूर्ण आव्हान देत आहेत. या स्पर्धेतील संघांना दादासाहेब फाळके, व्ही. शांताराम, भालजी पेंढारकर, पु. ल. देशपांडे, दादा कोंडके, निळू फुले, रंजना आणि भक्ती इनामदार इ. कलाकारांची नावे देण्यात आली आहेत. मराठी मनोरंजनविश्वातील बहुमुल्य योगदानासाठी या मातब्बर कलाकारांना देण्यात येणारी ही एक आगळीवेगळी मानवंदना असल्याची प्रतिक्रिया मराठी कलाकारांनी व्यक्त केली आहे.
ज्या कलाकारांचा अभिनय आपण गेली अनेक वर्षे टीव्ही, चित्रपट किंवा नाटकांमध्ये अनुभवला, तेच कलाकार आता खेळाडूच्या भूमिकेत दिसत आहेत. हा केवळ सामना नाही, तर कला आणि क्रीडा क्षेत्राचा एक अद्भूत संगम आहे, जिथे कलाकारांची कलात्मक ऊर्जा आता खेळाच्या मैदानात झळकेल. त्यांची बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग पाहणे रोमांचक ठरेल असा विश्वास यावेळी आयोजक रविंद्र चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान राज्याच्या राजकारणात तडाखेबंद खेळी करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनाही यावेळी क्रिकेट खेळण्याचा मोह आवरता आला नाही. रविंद्र चव्हाण यांनी यावेळी हातामध्ये बॅट घेत क्रिकेटच्या मैदानातही आपले कौशल्याची चुणूक दाखवली.


























