
निरेन आणि ग्रीनआर्च संस्थांच्या पुढाकाराने झाली परिषद
कल्याण दि.23 डिसेंबर :
अनिर्बंध वापरामुळे अतिशय धोकादायक पातळीवर पोहोचलेला भूजलसाठा पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग (पर्जन्य जलसंचय) अत्यंत सिंहाची भूमिका बजावत आहे. मात्र भूजल पातळी दीर्घकालीन टिकून राहण्यासाठी हे रेन वॉटर हार्वेस्टिंग शास्त्रोक्त पद्धतीने होणे याची माहिती होणे हेदेखील तितकेच गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर या क्षेत्रातील तज्ञ संस्था असलेल्या निरेन आणि ग्रीनआर्च यांच्या माध्यमातून कल्याणात प्रथमच प्लंबर परिषद संपन्न झाली. येथील बालक मंदिर संस्थेच्या सभागृहात झालेल्या या परिषदेत कल्याण डोंबिवलीतील 100 हून अधिक प्लंबर (नळ जोडणी-दुरुस्तीकार ) उपस्थित होते. (Awareness on Scientific Rainwater Harvesting Through Kalyan’s First-Ever Plumbers’ Conference)
लोकसंख्येचा झालेला विस्फोट, वाढते शहरीकरण, त्यातून पाण्याचा होणारा अनिर्बंध वापर आणि मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही त्याच्या साठवणुकीसाठी होणारे दुर्लक्ष यामुळे भूजल पातळी धोकादायक स्थितीवर येऊन ठेपली आहे. त्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे (पर्जन्य जलसंचय) कशा पद्धतीने आपण ही भूजल पातळी वाढवू शकतो? त्यासाठी असणारी शास्त्रीय पद्धत कोणती ? वाढलेली भूजल पातळी दीर्घकालीन टिकून राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कोणत्या? भूगर्भाची पाणी पातळी वाढण्यासह शाश्वत पाणी पुरवठा उपलब्ध कसा होईल?अशा विविध महत्त्वाच्या विषयांवर या परिषदेत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. ज्यामध्ये ग्रीनआर्च संस्थेचे अरुण सपकाळे यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगची शास्त्रोक्त पद्धत, त्यासाठी आवश्यक असणाऱ्या खड्ड्याचा आकार, बोअरवेल या विषयावर सखोल माहिती दिली. तर निरेन संस्थेचे आकाश वारिया यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी खास बनवण्यात आलेल्या निरेन फिल्टर आणि त्याच्या कार्यपद्धतीबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच शास्त्रोक रेन वॉटर हार्वेस्टिंगमध्ये हे फिल्टर पाण्याचा साठा दीर्घकाळ टिकण्यासाठी कशी आणि किती महत्त्वाची भूमिका बजावते याबाबतही माहिती दिली.
तर यावेळी उपस्थित असलेले कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत यांनी या उपक्रमाचे कौतुक करत रेन वॉटर हार्वेस्टिंग ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. तसेच ज्याप्रमाणे आपण आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी संपत्ती, पैसा, घरादाराची तजवीज करून जातो. त्याप्रमाणेच किंवा त्यापेक्षा अधिक आज पाण्याची बचत करून आपल्या पुढील पिढीपर्यंत ते कसे मिळू शकेल याची तजवीज करण्याची गरजही प्रशांत भागवत यांनी व्यक्त केली.
शास्त्रोक्त रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धतीबाबत बहुतांश बांधकाम व्यावसायिकांना माहिती आहे. परंतु खरे पाहिले तर ज्या व्यक्ती म्हणजेच हे प्लंबरच ही कामे करत असतात. त्यामुळे रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबतच्या या महत्त्वाच्या गोष्टी थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ग्रीनआर्च संस्थेचे संस्थापक अरुण सपकाळे आणि निखिल चौधरी यांच्या पुढाकाराने ही परिषद घेण्यात आली.


























