Home ठळक बातम्या केडीएमसी निवडणूक: पहिल्याच दिवशी विक्रमी 912 उमेदवारी अर्जांची विक्री, निवडणूक विभाग 6...

केडीएमसी निवडणूक: पहिल्याच दिवशी विक्रमी 912 उमेदवारी अर्जांची विक्री, निवडणूक विभाग 6 मधून सर्वाधिक तर 8 मध्ये सर्वात कमी

कल्याण-डोंबिवली दि.24 डिसेंबर :
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीची तारीख जस जशी जवळ येत चालली आहे. त्यानुसार इथल्या राजकीय घडामोडीनीही वेग घेतला आहे. त्यातही अद्याप महायुती आणि महाविकास आघाडीचे जागा वाटप अंतिम झाले नसले तरी इच्छुक उमेदवार मात्र कोणताही धोका पत्करायला तयार नाहीयेत. त्यामुळेच कालपासून सुरू झालेल्या उमेदवारी अर्ज विक्री प्रक्रियेला पहिल्याच दिवशी विक्रमी प्रतिसाद मिळाला. (KDMC Elections: A record 912 nomination forms sold on the very first day. Election Division 6 recorded the highest number of form sales, while Division 8 reported the lowest.)

केडीएमसीच्या 31 पॅनलसाठी बनवण्यात आलेल्या 9 निवडणूक निर्णय अधिकारी (RO) कार्यालयांतून तब्बल 912 उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. ज्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी विभाग 6 मधून सर्वाधिक 133 तर निवडणूक निर्णय अधिकारी विभाग 8 मधून सर्वात कमी 67 अर्ज घेण्यात आले आहेत.

नामनिर्देशन अर्जांच्या विक्रीच्या आकडेवारीवरून आगामी महापालिका निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आल्याचे स्पष्ट होत आहे. जरी जागा वाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्याचे सांगितले जात असले तरी इच्छुक उमेदवारांनी मात्र त्याला फारसे महत्त्व न देता आपापल्या स्तरावर मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कारण शिवसेना असो की भाजप दोन्ही पक्षांमध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या प्रचंड दिसून येत असल्याने युती नको असा दोन्ही बाजूकडील कार्यकर्त्यांचा सूर उमटत आहे. या पार्श्वभूमीवर युती झाल्यास आपल्याला उमेदवारी मिळेल की नाही या प्रश्नाने हवालदिल झालेले इच्छुक उमेदवार कोणताही धोका पत्करायला तयार नसल्याचे या विक्रमी अर्ज विक्रीवरून दिसत आहे.

निवडणूक निर्णय अधिकारीनिहाय नामनिर्देशन अर्ज विक्री

* RO-1 : 105 (पॅनल क्रमांक 2,3,4)
* RO-2 : 130 (पॅनल क्रमांक 1,5,6,10)
* RO-3 : 125 (पॅनल क्रमांक 7,8,9)
* RO-4 : 88 (पॅनल क्रमांक 11,12,18)
* RO-5 : 111 (पॅनल क्रमांक 13,14,15,16)
* RO-6 : 133 (पॅनल क्रमांक 20,26,27,28)
* RO-7 :78 (पॅनल क्रमांक 21,22,23,25)
* RO-8 : 67 (पॅनल क्रमांक 24,29,30)
* RO-9 : 75.(पॅनल क्रमांक 17,19,31)

एकूण विक्री : 912 नामनिर्देशन अर्ज

यामध्ये RO-6 कार्यालयातून म्हणजेच पॅनल क्रमांक 20,26,27 आणि 28 मधून सर्वाधिक 133 अर्जांची विक्री झाली असून, त्यापाठोपाठ RO-2 (130)आणि RO-3 (125) कार्यालयांचा क्रमांक लागतो. तर RO-8 कार्यालयात सर्वात कमी 67 अर्जांची विक्री नोंदविण्यात आली आहे.

या सर्व परिस्थितीवरून ज्यांना तिकीट मिळणार नाही अशा उमेदवारांची समजूत काढताना सर्वच पक्षाच्या नेत्यांची मोठी दमछाक होणार असल्याचे यातून स्पष्ट चित्र दिसत आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा