
डोंबिवली दि.24 डिसेंबर :
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोष केला. या आनंदोत्सवाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून श्री गणेश मंदिरापर्यंत वाजत-गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशे, घोषणा आणि भगव्या ध्वजांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
यावेळी कार्यकर्त्यांनी आगामी सर्व महापालिका निवडणुकांत मराठी माणसाचा भगवा फडकणार, असा ठाम विश्वास व्यक्त केला. “आज महाराष्ट्राचे एक स्वप्न साकार होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मराठी माणसाची हीच अपेक्षा होती,” अशी भावना यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

तसेच गद्दारी करून सत्तेत बसलेल्या लोकांचे राजकारण महाराष्ट्राला मान्य नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले. “मराठी माणसाविरोधात इतर भाषिक एकत्र होत असतील, तर येणाऱ्या महापालिका निवडणुकांत मराठी माणूस अधिक एकजुटीने भगवा फडकवेल,” असा निर्धार यावेळी मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांनी यावेळी व्यक्त केला.
या उद्धव आणि राज यांच्या एकत्रित येण्याच्या भूमिकेमुळे राज्याच्या राजकारणात नवे समीकरण तयार झाले असून त्याचे पडसाद आगामी महापालिका निवडणुकांत कसे उमटणार याबाबत राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.


























