Home ठळक बातम्या आयसीएआयच्या (ICAI) वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलच्या (WIRC) पदाधिकाऱ्यांची कल्याण-डोंबिवली ब्रँचला भेट

आयसीएआयच्या (ICAI) वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलच्या (WIRC) पदाधिकाऱ्यांची कल्याण-डोंबिवली ब्रँचला भेट

कल्याण दि. 11 फेब्रुवारी:
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (ICAI) वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलचे (WIRC) अध्यक्ष सीए केतन सैय्या, व्हाइस चेअरमन सीए पियूष चांडक आणि सचिव सीए जीनल सावला यांनी नुकतीच कल्याण-डोंबिवली ब्रँचला अधिकृत भेट दिली. या विशेष भेटीचे औचित्य साधून कल्याण-डोंबिवली ब्रँचच्या उल्हासनगर सीपीई (CPE) स्टडी सर्कलतर्फे शहाड येथील रिजन्सी अँटीलियाच्या सभागृहात केंद्रीय अर्थसंकल्पावर एका विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. (ICAI WIRC Office Bearers Visit Kalyan-Dombivli Branch)

ब्रँच व्हिजिट मार्गदर्शन आणि अर्थसंकल्पाचे विश्लेषण…
WIRC चे अध्यक्ष सीए केतन सैय्या यांनी या भेटीदरम्यान सभासदांना ब्रँचच्या उपक्रमांबाबत सखोल मार्गदर्शन केले आणि यंदाच्या अर्थसंकल्पाला ‘विकासाभिमुख’ संबोधले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात नवीन इन्कम टॅक्स कायदा, त्यातील दुरुस्ती आणि उद्योग क्षेत्रापुढील आव्हाने यावर भाष्य केले. तसेच रुपयाची घसरण आणि शेअर बाजारावरील दबाव अशा परिस्थितीत अर्थमंत्र्यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प भारताला २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ बनवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. उद्योगांनी आता कोणत्याही शासकीय कुबड्यांशिवाय जागतिक स्पर्धेसाठी सज्ज होऊन स्वावलंबी होण्याची वेळ आली आहे, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. तसेच एमएसएमई (MSME), उत्पादन क्षेत्र आणि सेमी कंडक्टर क्षेत्रात सरकारने आणलेल्या सुधारणांमुळे देश जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी ‘केंद्रीय अर्थसंकल्प २०२६’ या विषयावर सुप्रसिद्ध आर्थिक अभ्यासक सीए दिव्यांग ठक्कर यांचे विशेष व्याख्यान संपन्न झाले. यावेळी बोलताना त्यांनी “जगभरात आजच्या घडीला इतकी अस्थिरता असूनही भारताची अर्थव्यवस्था सर्वात वेगाने वाढत आहे, त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेतून भारताला वगळल्यास जगाचा विकासदर हा अत्यल्प प्रमाणात असेल” असे मत व्यक्त केले.

दिवसभर विविध उपक्रमांची रेलचेल…
WIRC पदाधिकाऱ्यांच्या या ब्रँच व्हिजिटच्या निमित्ताने दिवसभरात विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये महिला सभासदांसाठी विशेष संवाद सत्र, ब्रँचच्या माजी अध्यक्षांसोबत विशेष बैठक, भेटीच्या स्मरणार्थ प्रतिकात्मक वृक्षारोपण, ६० वर्षांवरील ज्येष्ठ सभासद आणि नवीन सभासदांशी विशेष संवाद, समाजासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या सभासदांचा विशेष गौरव करण्यासह प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्यासाठी प्रेस मीटचेही आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला आयसीएआय कल्याण-डोंबिवली ब्रँचचे अध्यक्ष सीए राकेश अग्रवाल, उपाध्यक्ष सीए अमित मोहरे, खजिनदार सीए विपुल शाह, समिती सदस्य सीए अमृता जोशी, सीए गिरीश तारवानी, सीए ईश्वर रोहरा, सीए अनुराग गुप्ता, माजी अध्यक्ष सीए जीतू रामरखियानी, सीए अंकित अग्रवाल, सीए कौशिक गडा, सीए मयूर जैन, उल्हासनगर सीपीई स्टडी सर्कलचे संयोजक सीए राहुल भाटिया, सीए मनाली भगतानी यांच्यासह २०० पेक्षा जास्त सीए सभासद उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा