Home ठळक बातम्या आयुष हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक OCT मशीनची सुविधा उपलब्ध; गुंतागुंतीच्या अँजिओप्लास्टी उपचारांना नवी दिशा

आयुष हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक OCT मशीनची सुविधा उपलब्ध; गुंतागुंतीच्या अँजिओप्लास्टी उपचारांना नवी दिशा

कल्याण | 28 मे :
हृदयरोग उपचार क्षेत्रात मोठी प्रगती करत कल्याणातील आयुष हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक OCT (ऑप्टिकल कोहरन्स टोमोग्राफी) मशीन रुग्णांच्या सेवेत दाखल करण्यात आली आहे. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे गुंतागुंतीच्या अँजिओप्लास्टी प्रक्रिया अधिक सुरक्षित, अचूक आणि जलद होणार असल्याने हृदयविकाराच्या रुग्णांना आता मुंबई – ठाण्याऐवजी कल्याणातच अत्याधुनिक उपचार उपलब्ध झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. (Advanced OCT Machine Facility Introduced at Ayush Hospital; A New Direction for Complex Angioplasty Treatments)

OCT हे अत्याधुनिक इमेजिंग तंत्रज्ञान असून याच्या सहाय्याने रक्तवाहिन्यांच्या आतील भागाचे अत्यंत सूक्ष्म आणि थ्री-डी (3D) स्वरूपात निरीक्षण करता येते. विशेषतः रक्तवाहिन्यांमध्ये कॅल्शियम, कोलेस्टेरॉलमुळे झालेल्या ब्लॉकेजची तीव्रता आणि स्टेंट बसवण्यासाठी आवश्यक असलेली अचूक जागा डॉक्टरांना स्पष्टपणे पाहता येते. त्यामुळे गुंतागुंतीची अँजिओप्लास्टी प्रक्रिया अधिक सुलभ आणि प्रभावी बनत असल्याची माहिती आयुष हॉस्पिटलचे कार्डिओलॉजिस्ट डॉ. जयंत गिते यांनी दिली.

यापूर्वी पारंपरिक पद्धतीमध्ये रक्तवाहिन्यांचे निरीक्षण मुख्यतः 2D स्वरूपात केले जात होते. मात्र OCT मशीनमुळे आता डॉक्टरांना सोनोग्राफीप्रमाणे रक्तवाहिन्यांचा आतील भाग अत्यंत स्पष्टपणे 3D स्वरूपात पाहता येणार आहे. यामुळे उपचारांमधील अचूकता वाढून रुग्णांच्या जीविताचा धोका लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सामान्यतः गुंतागुंतीच्या अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेसाठी दोन ते अडीच तासांचा कालावधी लागत होता. मात्र या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे उपचाराचा वेळ कमी होऊन आता उपचार प्रक्रिया ही अधिक सुरक्षित आणि परिणामकारक होणार आहे.

विशेष म्हणजे, आतापर्यंत अशा प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा मुंबईतील मोठ्या रुग्णालयांमध्येच उपलब्ध होत्या. मात्र आता आयुष हॉस्पिटलमध्ये ही सुविधा सुरू झाल्याने कल्याण-डोंबिवलीसह आसपासच्या रुग्णांना उपचारांसाठी मुंबई गाठण्याची गरज भासणार नाही. स्थानिक स्तरावरच अत्याधुनिक हृदयविकार उपचार उपलब्ध झाल्याने नागरिकांकडूनही समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा