
पहिल्या टप्प्यात 30 हजार तर दुसऱ्या टप्प्यात होणार 20 हजार वृक्ष लागवड
टिटवाळा दि.9 डिसेंबर :
एकीकडे नाशिकच्या तपोवनमधील प्रस्तावित वृक्षतोडीचा मुद्दा गाजत असतानाच दुसरीकडे कल्याणजवळील टिटवाळ्यात मात्र तब्बल 50 हजार देशी झाडांचे घनदाट जंगल उभे राहण्याच्या दृष्टीने सुरुवात झाली आहे. केडीएमसी आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड(बीपीसीएल) च्या माध्यमातून पहिल्या टप्प्यातील 30 हजार देशी वृक्षांची मियावाकी पद्धतीने लागवडीच्या उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला. केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल, शहर अभियंता अनिता परदेशी, बीपीसीएलचे पर्यावरण विभागाचे महाव्यवस्थापक अतुल व्यवहारे, उपआयुक्त संजय जाधव, सावली संस्थेचे माने आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला. (A Dense Urban Forest to Come Up in Manda–Titwala Through KDMC–BPCL Initiative; 30,000 Native Trees to Be Planted Using the Miyawaki Method)
संपूर्ण जगभरात आपल्या अनोख्या मात्र तितक्याच परिणामकारक वृक्ष लागवडीसाठी प्रसिद्ध असलेल्या जपानचा ‘मियावाकी’ पॅटर्न केडीएमसीसाठी चांगलाच फायदेशीर ठरताना दिसत आहे. गेल्या काही वर्षांत कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी मियावाकी’ पद्धतीने हजारो वृक्ष लागवड करण्यात आली आहे. कमीत कमी जागेमध्ये अतिशय घनदाट जंगल फुलवणे आणि निसर्गाला हातभार लावणे हा या संकल्पनेचा प्रमुख उद्देश आहे. त्याअंतर्गत मांडा टिटवाळा येथील इंदिरा नगर स्मशानभूमीच्या परिसरात असलेल्या मोकळ्या जागेवर मियावाकी पद्धतीने जंगल फुलवण्यात येत आहे. ज्यामध्ये वड, पिंपळ, कदंब, उंबर यासोबतच मसाला, आयुर्वेदिक अशा विविध देशी झाडांचा समावेश आहे. विशेष म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला एकही रुपया खर्च करावा लागणार नसून या वृक्ष लागवडीचा संपूर्ण खर्च भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे उचलण्यात आला आहे.
याठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये 30 हजार देशी वृक्षांची लागवड केली जाणार असून केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल आणि बीपीसीएलचे महाव्यवस्थापक अतुल व्यवहारे यांच्यासह आजुबाजूच्या परिसरातील शाळांचे शेकडो विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ही सर्व झाडे पुढील 3 वर्षांपर्यंत जगवण्याची जबाबदारी सावली या अशासकीय संस्थेला देण्यात आली आहे.

तर यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी सांगितले की प्रत्येक विद्यार्थ्याने त्याला शक्य असेल तिकडे एक झाड लावून ते जगवण्याचा प्रयत्न करावा. तसेच येत्या वर्षभरात कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात एक लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून शहरातील मोकळ्या जागांवर हे वृक्ष लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तर पर्यावरण रक्षण आणि निसर्ग संवर्धनासाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनकडून विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. कल्याण डोंबिवलीतील वृक्ष लागवड हा त्याचाच एक भाग असून येत्या काळामध्ये लाखो वृक्ष लागवडीचा आमचा संकल्प असल्याची माहिती यावेळी भारत पेट्रोलियमच्या पर्यावरण विभागाचे महाव्यवस्थापक अतुल व्यवहारे यांनी दिली.


























