Home ठळक बातम्या कल्याण-डोंबिवलीत स्वच्छतेचा नवा अध्याय; वारंवार कचरा पडणारी शहरातील ठिकाणांचे स्वच्छतेसह सुशोभीकरण सुरू

कल्याण-डोंबिवलीत स्वच्छतेचा नवा अध्याय; वारंवार कचरा पडणारी शहरातील ठिकाणांचे स्वच्छतेसह सुशोभीकरण सुरू

स्त्यावर कचरा टाकण्याऐवजी घंटागाडीमध्ये देण्याचे आवाहन

कल्याण डोंबिवली दि.24 नोव्हेंबर :
कल्याण डोंबिवली शहरांवर लागलेला अस्वच्छतेचा डाग पुसून काढण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याच प्रयत्नांमध्ये आता आणखी एका नव्या अध्यायाची भर पडली असून शहरात वारंवार कचरा पडणारी ठिकाणे (Garabage Vulnerable Points) स्वच्छ करून सुशोभित करण्याची मोहीम महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत आहे. मात्र नागरिकांनी रस्त्यावर कोणत्याही मोकळ्या जागी कचरा न फेकता केवळ घंटागाडीमध्येच देण्याचे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त रामदास कोकरे यांनी केले आहे. (A new chapter of cleanliness in Kalyan-Dombivli; Cleaning and beautification of frequently littered areas in the city begins)

स्वच्छता आणि अस्वच्छतेच्या मुद्द्यांवरून कल्याण डोंबिवली शहरे नेहमीच चर्चेत असतात. विशेषतः डम्पिंग ग्राउंडचा मुद्दा सोडवल्यानंतर आता उघड्यावर टाकण्यात येणारा कचरा महापालिका प्रशासनासह नागरिकांसाठीही मोठी डोकेदुखी ठरू लागली होती. या उघड्या कचऱ्याच्या ठिकाणांमुळे त्याभागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्यासह शहराचा चेहरा मोहराही आणखीनच विद्रूप होऊ लागला होता. त्यावर आता घनकचरा व्यवस्थापन विभागाने अनोखी शक्कल लढवत अशा वारंवार कचरा पडणाऱ्या ठिकाणांना (GVP) कायमस्वरूपी स्वच्छ राखण्याच्या दिशेने एक मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत कल्याण पश्चिमेतील बारावे जलशुध्दीकरण केंद्र परिसर, बारावे गाव या दोन आणि ठाकुर्ली पूर्वेच्या स्टेशन रोड परिसरात स्थानिक लोकप्रतिनिधी खुशबू चौधरी यांच्या पुढाकाराने एका ठिकाणाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. कल्याणातील 3 प्रभागात केडीएमसी सफाई कर्मचाऱ्यांमार्फत तर उर्वरित 7 प्रभागांमध्ये सुमित एल्कोप्लास्ट कंपनीच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून यशस्वीपणे ही मोहीम राबविण्यात येत आहे.

यामुळे तयार होत आहेत कचऱ्याची ठिकाणे…
कल्याण डोंबिवलीमध्ये वारंवार कचरा पडणारी ठिकाणे का तयार होत आहेत? यामागची कारणे शोधण्यासाठी केडीएमसी घनकचरा व्यवस्थापन विभागाने शोधमोहीम सुरू केली आहे. त्यात असे आढळून आले की चाळ परिसर किंवा झोपडपट्टी परिसरातील बहुतांश रहिवासी सकाळी कामाला जात असल्याने याठिकाणी घंटागाडीमध्ये कचरा संकलन होत नाही. त्याऐवजी हे रहिवासी या परिसरातील मोकळ्या जागेवर रात्रीच्या वेळेत कचरा टाकत असल्याने तसेच नागरिकाच्या उदासीनतेमुळे ही कचऱ्याची ठिकाणे निर्माण होत असल्याचे कारण समोर आल्याची माहिती उपआयुक्त रामदास कोकरे यांनी दिली.

कचऱ्याच्या ठिकाणांचे अशा पद्धतीने होणार सुशोभीकरण…
कल्याण डोंबिवलीतील अशा भागांमध्ये आता संध्याकाळच्या वेळेलाही महापालिकेकडून घंटागाडी पाठवण्यात येत आहे. जेणेकरून रस्त्यावर पडणारा कचरा बंद होईल. त्यानंतर अशी कचऱ्याची ठिकाणे स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकाऱ्याने महापालिका कर्मचाऱ्यांकडून कचरामुक्त आणि स्वच्छ केली जात आहेत. संपूर्णपणे स्वच्छ झालेली ही ठिकाणे आकर्षक दिसण्यासाठी आकर्षक रंगांनी रांगोळ्या,भित्तीचित्रे काढणे, जुन्या टायरमध्ये सजवलेल्या रंगीत कुंड्या ठेवणे, शोभेची झाडे आणि छोटेखानी हिरवळ निर्माण करणे आदी सुशोभीकरण केले जाणार आहे.
जेणेकरून याठिकाणी कचरा टाकण्यापासून नागरिकांना परावृत्त करता येईल. येत्या काळात कल्याण डोंबिवलीत असणारी सर्वच कचऱ्याची ठिकाणे अशा प्रकारे बंद करून त्यांचे सुशोभीकरण करून संपूर्णपणे कचरामुक्त केली जाणार आहेत. त्यासाठी नागरिकांनी घरातील कचरा वर्गीकरण करून केवळ घंटागाडीमध्येच देण्यासह अशाप्रकारची गलिच्छ ठिकाणे आपल्या परिसरात निर्माण न होण्याची दक्षता घेण्याचे आवाहनही कल्याण डोंबिवली महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त रामदास कोकरे यांनी केले आहे.

दरम्यान यापूर्वी कल्याण डोंबिवली शहरात तब्बल 3 हजार 700 च्या आसपास कचराकुंड्या अस्तित्वात होत्या. त्या काढण्यात आल्यानंतर घंटागाडीमध्येच कचरा देण्याची पद्धत सुरू करण्यात आली होती. मात्र त्यामध्ये काहीसा विस्कळीतपणा आल्यामुळे अशा स्वरूपाची कचऱ्याची ठिकाणे वाढल्याने त्याला आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या मोहिमेची गरज भासली आहे. या बदलामुळे परिसरात केवळ स्वच्छताच झाली नाही तर एक नवा हरित कोपरा उभा राहिल्याने शहराचा चेहरामोहरा बदलण्यास मोठी मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा