
कल्याण डोंबिवलीतील नागरिकांनी कर न भरण्याचे केले आवाहन
डोंबिवली दि.23 मे :
एकीकडे कोणताही करवाढ नसलेला अर्थसंकल्प सादर केल्याचे केडीएमसी प्रशासनाने सांगितले असताना अचानक कचरा संकलनाच्या करामध्ये 300 रुपयांची वाढ कशी काय करण्यात आली असा प्रश्न विचारत नागरिकांवर लादलेला हा जिझिया कर रद्द करण्याची आग्रही मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात पक्षाचे जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांनी एक पत्रकार परिषद घेत करवाढ, कचरा संकलन, ड्रेनेज सफाई, रस्त्यांवरील खड्डे आदी नागरी समस्यांवरून केडीएमसी प्रशासनाला धारेवर धरले. (Abolish the Jizya tax levied in the name of garbage collection – Uddhav Balasaheb Thackeray’s demand from Shiv Sena party)
कचरा संकलनासाठी केडीएमसी प्रशासनाकडून काही दिवसांपूर्वीच चेन्नई पॅटर्नच्या धर्तीवर नव्या संस्थेला शहर स्वच्छतेचे काम दिले आहे. या पार्श्वभूमीवर केडीएमसी प्रशासनाने नवीन कर पद्धतीनुसार सर्वसामान्य नागरिकांवर ५०% पर्यंत करवाढ लादण्यात आली आहे. ६०० रुपयांचा वार्षिक कर आता ९०० रुपयांचा करण्यात आला आहे. घराचे क्षेत्रफळ लहान असो वा मोठे, सर्वांना हा समान कर लावण्यात आला असून ही सरळसरळ जनतेची लूट असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या दिपेश म्हात्रे यांच्याकडून करण्यात आला.
तसेच या नव्या कचरा संकलन आणि वाहतूक या योजनेअंतर्गत कचऱ्याचे केवळ संकलन केले जाणार असून त्यावर कोणतीही प्रक्रिया केली जाणार नाही. सध्या कल्याण डोंबिवलीमध्ये दररोज सुमारे ८५० टन कचरा तयार होतो. मात्र, उंबर्डे, बारावे आणि डोंबिवलीतील लवकरच सुरू होणाऱ्या प्लांटची एकत्रित प्रक्रिया क्षमता जवळपास ६५० टन एवढीच आहे. अजून मागील बऱ्याच वर्षापासून पडलेला कचरा दुर्गाडी किल्ल्यासमोर असलेल्या डोंगरांवर आहे. मागील अनेक वर्षांपासून तिथे १०,००० मेट्रिक टन कचरा साचलेला असून कोणतीही प्रक्रिया करण्यात आलेली नसल्याचेही म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.
महानगरपालिकेतील ठेकेदार बदलले जातात पण काम करणारी माणसे मात्र तीच राहतात. याआधी अँथोनी मग आरबीएल आणि आता सुमित. पण कामाच्या दर्जात कोणताही फरक पडलेला नसून सत्ताधारी पक्ष लपवाछपवी करून जनतेवर आर्थिक बोजा टाकत असल्याचा आरोपही दिपेश म्हात्रे यांनी केला.
तर शहरातील ड्रेनेज आणि रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. काँक्रीट रस्त्यांची कामे रखडली आहेत, मलवाहिन्या चोकअप झालेल्या आहेत. अशा परिस्थितीत एकही नवीन ठेकेदार नेमलेले नसून येणाऱ्या पावसाळ्यात शहरात गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता असतानाही प्रशासन मात्र याबाबत गंभीर नसल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.
या सर्व बाबींवर प्रशासनाकडून योग्य नियंत्रण नसेल, अंकुश नसेल तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा देतानाच शहरातील नागरिकांनी या वाढीव कराचा विरोध करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कल्याण जिल्हा सचिव सुधीर पाटील कल्याण उप तालुकाप्रमुख भालचंद्र म्हात्रे, कल्याण ग्रामीण डोंबिवली विधानसभा समन्वयक ओमनाथ नाटेकर, डोंबिवली पश्चिम शहर प्रमुख तेलगोटे उपशहर प्रमुख शाम चौगुले चेतन म्हात्रे , कुणाल ढापरे, संजय पाटील राहुल चौधरी,युवासेनाचे आदित्य पाटील शिवसेना महिला आघाडी सुप्रियाताई चव्हाण विधानसभा संघटिका, अक्षरा मनोज पटेल, शहर संघटिका डोंबिवली पूर्व प्रियंका विचारे शहर संघटिका डोंबिवली पश्चिम, रिचा कामतेकर युवती शहर अधिकारी डोंबिवली पश्चिम, प्रियांका पाटील शाखा संघटिका कोपरगाव, स्मिता पाटिल उपशहर प्रमुख डोंबिवली पूर्व, दीपाली राउळ उपविभाग संघटिका आयरे रोड, छाया सावंत शाखा संघटिका, प्रिया विजय दांडगे शाखा संघटिका, स्वप्नाली बांधणे डोंबिवली पश्चिम तसेच शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते.