
कल्याण डोंबिवली दि.13 ऑगस्ट :
राजकीय वळण लागल्याने गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या केडीएमसीच्या मांस विक्री बंदीच्या निर्णयावर महापालिका प्रशासन कायम असल्याची माहिती आयुक्त अभिनव गोयल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. तसेच 15 ऑगस्टला केवळ विक्रीवर बंदी असून खाण्यावर कोणत्याही प्रकारची बंदी नसल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले. (“Ban is not on eating but on selling”; KDMC upholds decision on August 15 meat sale ban)
केडीएमसी प्रशासनाने 15 ऑगस्टला मांसविक्री बंदीचा निर्णय जाहीर केल्यापासून त्याचे राजकीय वर्तुळातही तीव्र पडसाद उमटत आहेत. केवळ कल्याण डोंबिवलीमध्ये स्थानिक पातळीवरच नाही तर थेट राज्याच्या मंत्री महोदयांनीही त्यामध्ये आपली मते व्यक्त केल्याने हा वाद आणखीनच उफाळून आला आहे. तर कल्याण डोंबिवलीमध्ये मांस विक्रेत्यांच्या संघटनांसह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आदी राजकीय पक्षांनीही महापालिकेच्या या निर्णयाविरोधात अक्षरशः रान उठवले आहे. तसेच ही बंदी उठवली नाही तर यातील काही राजकीय पक्षांनी केडीएमसी मुख्यालयाच्या बाहेर मांसविक्री करणार असल्याचा इशारा दिला आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर केडीएमसी प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी हा सर्व राजकीय विरोध झुगारून प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे आजच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. तसेच याविरोधात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास पोलीस प्रशासनाच्या सहाय्याने ती हाताळण्यात येईल असेही या पत्रकार परिषदेत आयुक्त अभिनव गोयल यांनी सांगितले.
तर 1988 सालापासून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून 15 ऑगस्टच्या दिवशी मांस विक्री बंदीची अधिसूचना जारी करण्यात येत आहे. हा यंदाच्या वर्षी पहिल्यांदा काढलेला निर्णय नसल्याची बाबही केडीएमसी आयुक्तांनी निदर्शनास आणून दिली.
या पत्रकार परिषदेला आयुक्त अभिनव गोयल यांच्यासह अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, उपआयुक्त संजय जाधव, कांचन गायकवाड हे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.