
एका नायजेरियन नागरिकासह 3 ड्रगडीलर जेरबंद, 2 कोटींचे एमडी आणि कोकेन जप्त
कल्याण दि.14 फेब्रुवारी :
कल्याणच्या पोलीस उपआयुक्त,परिमंडळ 3 मधील अँटी नार्कोटिक्स सेलने (अंमली पदार्थ विरोधी पथक) अंमली पदार्थ तस्करीविरोधात आणखी एक मोठी कारवाई करत ड्रग डीलरचे मोठे नेटवर्क उद्ध्वस्त केले आहे. यामध्ये एका नायजेरियन नागरिकासह 3 ड्रगडीलरला जेरबंद करण्यात यश आले असून त्यांच्याकडून तब्बल 2 कोटींहून अधिक किमतीचा एमडी म्हणजेच मेफोड्रोन आणि कोकेनचा साठाही जप्त केला आहे. विशेष म्हणजे या ड्रग डीलरकडून वापरण्यात आलेल्या ॲक्टीव्हा गाडीच्या वाकवण्यात आलेल्या नंबरप्लेटमुळे हे ड्रगरॅकेट उद्ध्वस्त करण्यात यश मिळाल्याची माहिती डीसीपी अतुल झेंडे यांनी दिली.
संशयास्पद हालचालींसह वाकवण्यात आलेल्या नंबरप्लेट…
१३ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.२० वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेतील गणेशनगर, उंबर्ली गाव परिसरात कल्याण पोलिसांचे अँटी नार्कोटिक्स सेलची प्रतिबंधात्मक कारवाईसाठी गस्त सुरू होती. या गस्तीदरम्यान पोलिसांना मुख्य रस्त्याच्या कडेला तिघे इसम संशयास्पद हालचाली करत एकमेकांशी बोलत असल्याचे आढळून आले. त्यांच्यातील एक परदेशी नागरिक पाठीला काळी बॅग घेऊन पिवळ्या रंगाच्या ॲक्टीव्हावर होता. आणि या गाडीची नंबरप्लेट दिसू नये म्हणून मुद्दाम वाकवलेली असल्याचे आढळल्याने पोलिसांचा संशय आणखीनच बळावला. या तिघांच्या चौकशीसाठी अँटी नार्कोटिक्स सेल पुढे जात असतानाच तिघांनीही पळण्याचा प्रयत्न केला. मात्र अँटी नार्कोटिक्स सेलच्या पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून तिघांनाही ताब्यात घेतले. त्यांना पकडल्यानंतर पोलिसांनी त्यांची आणि त्या बॅगेची झडती घेतली असता त्यातील अंमली पदार्थ पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांच्याकडून तब्बल १ किलो ४ ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन (एमडी) – (अंदाजे किंमत ₹२ कोटी ८० हजार) आणि १५ ग्रॅम कोकेन – (अंदाजे किंमत ₹१५ लाख) पोलिसांना आढळून आल्याची माहिती डीसीपी अतुल झेंडे यांनी दिली.

ही कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त (पूर्व) संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे यांच्या सूचनेनुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, ग्रेड पोलिस निरीक्षक जितेंद्र ठोके, हवालदार देवरे, शिपाई राहुल शिंदे, अमित शिंदे, खुशाल नेरकर, आणि खरसाण यांनी केली.
याप्रकरणी पोलिसांनी ३६ वर्षीय नायजेरियन ड्रग डीलरसह अविनाश व्यंकटेश सदरला (वय ३४) आणि गजेंद्रन संजीव नायडु (वय ३४) या दोघा ड्रग डीलरच्याही मुसक्या आवळण्यात यश मिळवले आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २२(क), २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने आरोपींना १७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईमुळे अंमली पदार्थ पुरवठा साखळीला मोठा धक्का बसला असून शहरातील गुन्हेगारीविरोधी मोहिमेला अधिक बळ मिळाले आहे.
तर गेल्या वर्षभरात अंमली पदार्थ तस्करीविरोधात डीसीपी अतुल झेंडे यांनी आखलेल्या व्यापक मोहिमेच्या माध्यमातून आतापर्यंत 146 अंमली तस्करांवर 2 मोक्कासह 100 हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ज्यामध्ये 244 किलोहून अधिक गांजा, 4 किलोहून अधिक एमडी ड्रग्स, 111 ग्रॅम चरस, प्रतिबंधित असलेल्या नायट्रोझेपॅम -NiNdia 10 या 1हजार 800 गोळ्या आणि कोडिनयुक्त औषधाच्या बाटल्या असा 6 कोटी 36 लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

























