
मुंबईतील राज्य अधिवेशनात केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केली घोषणा
मुंबई दि.1 जुलै :
भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे. मुंबईत सुरू असलेल्या भाजपच्या राज्य परिषद अधिवेशनात केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. नुकत्याच झालेल्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीनंतर रविंद्र चव्हाण यांच्यावर भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्याच्या काही महिन्यानंतर आता त्यांची प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. (“BJP is my identity”; Ravindra Chavan elected unopposed as Maharashtra BJP state president)
मुंबईतील वरळी डोम येथे भाजपचे राज्य परिषदेचे अधिवेशन सुरु झाले. त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष पदासाठी रवींद्र चव्हाण यांचा एकट्याचाच अर्ज आला होता. त्यामुळे राज्य भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी त्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला होता. तर आज रवींद्र चव्हाण यांनी मावळते अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून या शानदार सोहळ्यात प्रदेशाध्यापदाची सूत्रे स्वीकारली. प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी केंद्रीय भाजपने केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांना पाठविले होते. रिजिजू यांच्या उपस्थितीत सोमवारी प्रदेश कार्यालयात निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री पंकजा मुंडे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, अशोक उईके, माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार आदी उपस्थित होते. तर महायुतीमध्ये असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आणि पक्षाच्या सर्वच प्रमुख नेत्यांनी प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रविंद्र चव्हाण यांचे अभिनंदन केले आहे.
दरम्यान रविंद्र चव्हाण सलग चार वेळा निवडून आलेल्या डोंबिवली मतदारसंघासह कल्याण डोंबिवलीमध्ये चव्हाण यांच्या या निवडीबद्दल जल्लोष साजरा केला जात आहे. तर ठिकठिकाणी रविंद्र चव्हाण यांचे अभिनंदनपर बॅनर लावून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे. प्रचंड दांडगा जनसंपर्क आणि पक्षाने आतापर्यंत दिलेल्या सर्वच जबाबदाऱ्यांमध्ये १०० टक्के यश अशी रविंद्र चव्हाण यांची ओळख आहे.
तर भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर “भाजपा हीच माझी ओळख” या मथळ्याखाली चव्हाण यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
“भाजप हीच माझी ओळख” – रविंद्र चव्हाण यांची पोस्ट जशीच्या तशी…
भाजप हीच माझी ओळख..
२५ वर्षांपूर्वी भारतीय जनता पार्टीच्या भारतीयत्व जपणाऱ्या विशाल विचारधारेत सामील झालो. आपली विचारधारा विशाल गंगेप्रमाणे पवित्र आणि प्रवाही आहे. ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ हा विचार देणाऱ्या गंगेने मुख्य प्रवाहात मला सामावून घेतले. या विचारधारेने सामाजिक भान दिलं, आयुष्याच्या वळणावर मार्गक्रमण करण्याचं ध्येय दिलं, जगण्याची दिशा दिली. आपल्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याने जर विचारधारेचे रक्षण केले तर विचारधारा तुमचे रक्षण करेल, हे मी स्वतःच्या अनुभवावरून सांगू शकतो.
पक्षश्रेष्ठींचे मार्गदर्शन, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोलाची साथ तसेच लोकांचे शुभाशीर्वाद हेच माझे बलस्थान आहे आणि त्याचसोबत सर्वांचे प्रेम आणि विश्वास या शिदोरीच्या बळावरच प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा स्वीकारत आहे. यापुढील प्रवासातही तुम्हा सर्वांचा स्नेह, विश्वास आणि आपुलकी या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत.
आज भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचू शकतो, ही संघटनेची ताकद आहे. अशी ताकद भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला मिळो यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन ही ग्वाही देतो.
माझ्यावर विश्वास दाखवून प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा माझ्या हाती सोपवल्याबद्दल आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, केंद्रीय मंत्री आदरणीय अमितभाई शाह, राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जे. पी. नड्डाजी, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह भाजपा परिवारातील सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार !