Home ठळक बातम्या केडीएमसीतील स्थायी समिती सभापतीसह सभागृह नेतेपद भाजपला मिळावे – भाजप कल्याण जिल्हा...

केडीएमसीतील स्थायी समिती सभापतीसह सभागृह नेतेपद भाजपला मिळावे – भाजप कल्याण जिल्हा कोअर समितीच्या बैठकीत ठराव

कल्याण दि.7 मार्च :
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील स्थायी समितीचे सभापतीपद तसेच सभागृह नेतेपद भारतीय जनता पक्षाला मिळावे असा ठराव भाजपच्या कल्याण जिल्हा कोअर समितीच्या बैठकीत एकमताने करण्यात आला. हा ठराव भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठविण्यात येणार असून त्याबाबत प्रदेश स्तरावर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली आहे. (BJP Kalyan District Core Committee Passes Resolution Seeking Standing Committee Chairman and House Leader Posts in KDMC)

भाजपच्या कल्याण जिल्हा कोअर समितीची बैठक आज पार पडली. या बैठकीला माजी मंत्री ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, आमदार सुलभा गायकवाड, जिल्हाध्यक्ष नंदू परब, कल्याण डोंबिवलीचे उपमहापौर राहुल दामले, गटनेते शशिकांत कांबळे, माजी जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, नगरसेवक दिपेश म्हात्रे, वरुण पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

महायुतीच्या माध्यमातून कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक लढविण्यात आली होती. त्यानंतर महापौरपद शिवसेनेला तर उपमहापौरपद भाजपाला मिळाले आहे. यानंतर आता महापालिकेतील स्थायी समितीचे सभापतीपद आणि सभागृह नेतेपद भाजपाला देण्यात यावे, अशी भूमिका या बैठकीत मांडण्यात आली आणि त्याबाबत एकमताने ठराव करण्यात आल्याचे माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले.

यासोबतच महापालिकेच्या विविध विषय समित्यांवर भाजप नगरसेवकांच्या नियुक्त्यांबाबतही बैठकीत चर्चा झाली. त्याबाबतचा सविस्तर अहवाल प्रदेश नेतृत्वाकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान या बैठकीत भाजपाच्या कल्याण जिल्ह्यातील संघटनात्मक कार्याचा आढावाही घेण्यात आला. नवनियुक्त नगरसेवक आणि नगरसेविकांना महापालिकेच्या सर्वसाधारण सभा, कामकाजाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी तसेच जिल्ह्यातील २० मंडल पदाधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. आगामी काळात पक्षाची संघटनात्मक मजबुती वाढविण्यासाठी विविध सूचनांवरही बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे ते म्हणाले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा