
काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्यासह सगळ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव
कल्याण दि.29 जुलै :
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी कल्याणचे ब्रिजकिशोर दत्त यांची फेरनिवड करण्यात आली आहे. कल्याण शहरातील जुने रहिवासी आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य संजय दत्त यांचे ते लहान बंधू आहेत. प्रदेश काँग्रेसमध्ये सरचिटणीसपदी फेरनिवड झाल्याबद्दल कल्याण डोंबिवली शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ब्रीज दत्त यांचे अभिनंदन केले आहे. (Brijkishore Dutt re-elected as Maharashtra Pradesh Congress Committee General Secretary)
कल्याण शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी सचिन पोटे असताना युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदापासून ब्रीज दत्त यांनी आपल्या कामाची सुरुवात केली आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस पदापर्यंतचा पल्ला गाठला आहे. पक्षप्रेम, संघटन कौशल्य, आणि कार्यक्षम नेतृत्व यामुळे त्यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्रभर सक्रिय काम करत काँग्रेस पक्षाचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवल्याची प्रतिक्रिया सचिन पोटे यांनी व्यक्त केली आहे.
तसेच ब्रीज दत्त यांनी नाशिक शहर प्रभारी म्हणून केलेल्या कामाचेही पक्षश्रेष्ठींकडून कौतुक झाले आहे. त्याशिवाय भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रा हे दोन्ही पक्षाचे उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तर आपल्या युवक काँग्रेसच्या कार्यकाळापासून ब्रीज दत्त यांनी निवडणूक कालावधी आणि निवडणूक कामासाठी देशाच्या विविध राज्यांमध्ये अतिशय परिणामकारकपणे काम केले आहे.
याशिवाय ब्रीजकिशोर दत्त हे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस म्हणून काम करत असताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे रमेश चेन्नीथला यांच्यासोबत त्यांनी महाराष्ट्रभर दौरे करत संघटनेच्या बळकटीसाठी मोठे योगदान दिल्याचेही पोटे यांनी सांगितले.
आज त्यांची ही पुनर्नियुक्ती ही त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीची आणि कार्यक्षमतेची पोचपावती असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या वरिष्ठ वर्तुळातून उमटत असून काँग्रेस पक्षाचे विचार आणि ध्येय-धोरणे ते अधिक जोमाने जनसामान्यांपर्यंत पोहोचवत राहतील अशा शुभेच्छा जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी दिल्या आहेत.