
डब्ल्यूआयआरसी ऑफ आयसीएच्या कल्याण डोंबिवली शाखेतर्फे सीए परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार
कल्याण दि.23 जुलै :
चार्टर्ड अकाउंटंट म्हणजेच सीए हे देशाचे आर्थिक डॉक्टर असून देशाचा आर्थिक कणा मजबूत करण्यामध्ये आपली महत्त्वाची भूमिका असल्याचे मत सीए व्योमेश पाठक यांनी व्यक्त केले. वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटसच्या कल्याण डोंबिवली शाखेतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. वर्ल्ड युथ स्किल्स डेचे औचित्य साधून आयसीए कल्याण डोंबिवली शाखेतर्फे सीए परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान आणि सेमिनारचे आयोजन कल्याणाच्या अग्रवाल महाविद्यालय सभागृहात करण्यात आले होते. (CA is the economic doctor of the country, plays an important role in strengthening the economic backbone – CA Vyomesh Pathak)
यावेळी कल्याण डोंबिवली ब्रँच अध्यक्ष सीए राकेश अग्रवाल, उपाध्यक्ष सीए अमित मोहरे, सचिव सी ए प्रदीप मेहता, खजिनदार सी ए विपुल शहा, समिती सदस्य सी ए अनुराग गुप्ता, सी ए रोहन पाठक, सी ए ईश्वर रोहरा, सी ए गिरीश थारवानी, सीए अमृता जोशी, माजी अध्यक्ष सी ए सौरभ मराठे, सी ए पराग प्रभुदेसाई, सी ए मयुर जैन आणि वरिष्ठ सदस्य सी ए माधव खिस्ती उपस्थित होते.
सीएची परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षेपैकी एक समजली जाते. त्यामूळे ती उत्तीर्ण करणे आणि उत्तीर्ण झाल्यानंतर या क्षेत्रात यशस्वी होणे या दोन्हीही मोठ्या आव्हानात्मक गोष्टी आहेत. परंतु हा कोर्स आपल्याला आयुष्यात अपयश पचवायला शिकवतो असे सांगत सीए व्योमेश पाठक यांनी सीएचे महत्त्व अधोरेखीत केले.
तर इतरांशी स्पर्धा करण्यामध्ये अजिबात आपला वेळ घालवू नका. कारण तुमची स्पर्धा इतरांशी नाही तर तुमच्या स्वतःशीच आहे. लोकांना जज करण्यात अजिबात वेळ न घालवता स्वतःला ओळखायला शिका, आपल्या प्रत्येक समस्येची उत्तरे आपल्यातच असून ती बाहेर शोधायला जाऊ नका अशा विविध दृष्टिकोनातून सीए व्योमेश पाठक यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना कानमंत्र दिला.
या मार्गदर्शनानंतर सीएच्या अंतिम परीक्षेत 39 वा क्रमांक मिळवलेल्या यश अग्रवालसह फाऊंडेशन परीक्षेमध्ये तिसऱ्या आलेल्या शार्दुल विचारे आणि दहावी आलेल्या सान्वी सिंघल यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला नव्याने सीए झालेले 140 विद्यार्थी उपस्थित होते.