
मूळ पक्ष वेगळा, प्रवेश केलेला पक्ष वेगळा आणि तिसऱ्याच पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल
कल्याण डोंबिवली दि.30 डिसेंबर :
तब्बल दोन दशकांनंतर होऊ घातलेली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची यंदाची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यापासूनच गाजत आहे. आधी एकमेकांचे उमेदवार पळवा पळवी, मग एकमेकांविरुद्ध दंड थोपटत वाकयुद्ध आणि त्यानंतर मग गळ्यात गळे घालून मैत्रीच्या आणाभाका. त्यामुळे सगळे काही शांत झाल्याचे वाटत असतानाच मग जागावाटपावरून उफाळून आलेला पक्षांतर्गत रोष आणि तोही खुजा वाटावा इतकी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झालेली गडबड आणि गोंधळाची राजकीय परिस्थिती. (Chaotic and Confusing Elections; Turmoil on the Last Day of Filing Nomination Papers)
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस असतानाही निवडणूक लढवणाऱ्या एकाही राजकीय पक्षाकडून आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर झाली नाही. याला कल्याण पूर्व आणि पश्चिमेतील उमेदवारांची नावे समोर आणत भाजपने काही प्रमाणात अपवादात्मक भूमिका घेतली असली तरी डोंबिवलीतील अधिकृत उमेदवारांबाबत मात्र कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.
तर सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास अखेर मनसेने कल्याण डोंबिवलीतील या उमेदवारांच्या राजकीय गुप्ततेला छेद देत आपल्या 49 उमेदवारांची यादी जारी केली. मात्र इतर प्रमुख पक्षांनी आपापल्या याद्या जाहीर न केल्याबाबत जितका धक्का बसला नाही त्यापेक्षा जास्त धक्का मनसेकडून प्रसिद्ध करण्यात आलेली ही यादी वाचून बसला. कारण भाजप आणि शिवसेनेकडून ज्या माजी नगरसेवक किंवा पक्षाच्या प्रबळ दावेदारांना उमेदवारी नाकारण्यात आली, अशा दोन्ही पक्षांतील कितीतरी उमेदवारांच्या नावाचा त्यात समावेश आहे.
इतकेच नाही तर त्यामध्ये काही उमेदवारांनी तर अक्षरशः कहरच केला आहे. आधी आपल्या मूळ पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला, मात्र या दुसऱ्या पक्षातही तिकीट न मिळाल्याने तिसऱ्या एका राजकीय पक्षाचे दार ठोठावले आणि मग अखेर चौथ्याच पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल केला.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अशा प्रकारची गडबड आणि गोंधळाची राजकीय परिस्थिती यापूर्वी कधीच झाली नसल्याचे राजकीय जाणकारांनी सांगितले. तसेच आजचे चित्र ही तर आणखी एका घडामोडीची चुणूक असून येणाऱ्या दिवसांत अनेक आणि आश्चर्यजनक राजकीय घडामोड होण्याच्या दिशेची ही चिन्हं असल्याचेही ते म्हणाले.
यंदाच्या महापालिका निवडणुकीचे हे राजकीय चित्र इतके अस्थिर आणि अस्पष्ट आहे की त्याचा अंदाज बांधणे हे राजकीय तज्ञांच्याही आवाक्याबाहेर दिसत आहे.

























