Home ठळक बातम्या काँग्रेसकडून कल्याण जिल्ह्यासाठी प्रचार प्रमुखासह नविन ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर

काँग्रेसकडून कल्याण जिल्ह्यासाठी प्रचार प्रमुखासह नविन ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर

कल्याण दि.17 डिसेंबर :
गेल्या काही दिवसांत घडलेल्या पक्षांतर्गत राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून कल्याण डोंबिवलीमध्ये जातीने लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारप्रमुखासह कल्याण पूर्व आणि पश्चिमेतील नव्या ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. ( Congress Announces New Block Presidents Along with Campaign In-Charge for Kalyan District)

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि कल्याण जिल्हा प्रभारी राजन भोसले यांच्या माध्यमातून निवडणूक प्रचारप्रमुख म्हणून माजी नगरसेविका रत्नप्रभा म्हात्रे यांची नियुक्ती जाहीर केली आहे. तर कल्याण पूर्व आणि पश्चिमेतील विविध ब्लॉकसाठी प्रभारी ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील यांच्या आदेशानुसार या नियुक्त्या करण्यात आल्या असून याबाबतचे अधिकृत पत्र जारी करण्यात आले आहे.

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या नियुक्त्यांनुसार कल्याण (प) A ब्लॉकसाठी कासिफ सय्यद, कल्याण (प) B ब्लॉकसाठी चेतन भंडारी तर कल्याण पूर्व B ब्लॉकसाठी लालचंद तिवारी यांची ब्लॉक अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

या सर्व संबंधित पदाधिकाऱ्यांनी तत्काळ कार्यभार स्वीकारून संघटनात्मक कामकाजाला गती द्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच सर्व संबंधितांना आपल्या स्तरावरून या नियुक्त्यांची माहिती कळविण्याचे आवाहनही पत्राद्वारे करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांत घडलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या नियुक्त्या अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जात असून या नियुक्त्यांमुळे कल्याण–डोंबिवली शहरात काँग्रेस संघटना मजबूत होण्यास मदत होईल. तसेच या नियुक्त्यांमुळे पक्षाला नवसंजीवनी मिळाली असून येणाऱ्या केडीएमसी निवडणुकीत अधिकाधिक नगरसेवक निवडून आणू असा विश्वास जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांनी व्यक्त केला आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा