Home ठळक बातम्या केडीएमसीच्या खंबाळपाडा डेपोबाहेर कंत्राटी कामगारांचे आंदोलन; दिपेश म्हात्रेंच्या मध्यस्थीनंतर आंदोलन स्थगित

केडीएमसीच्या खंबाळपाडा डेपोबाहेर कंत्राटी कामगारांचे आंदोलन; दिपेश म्हात्रेंच्या मध्यस्थीनंतर आंदोलन स्थगित

उर्वरित कंत्राटी कामगारांना कामावर घेण्यासाठी 15 ऑगस्टची डेडलाईन

डोंबिवली दि.29 जुलै :
केडीएमसीसाठी यापूर्वी काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांतर्फे आपल्या विविध मागण्यांसाठी खंबाळपाडा डेपोबाहेर आज आंदोलन करण्यात आले. स्वच्छतेच्या नविन कंत्राटदाराकडून कामावर घेण्यासह पूर्वीच्या कंत्राटदाराकडून थकलेला पगार मिळण्याच्या प्रमूख मागण्यांसाठी आज हे आंदोलन केले गेले. ज्यामुळे घनकचरा विभागाच्या कचरागाड्या बाहेर पडू शकल्या नसल्याने काही काळ स्वच्छतेचे काम विस्कळीत झाले होते. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमूख दिपेश म्हात्रे यांनी मध्यस्थी करत येत्या 15 ऑगस्टपर्यंत कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचे आश्वासन केडीएमसी प्रशासनाकडून प्राप्त केल्यानंतर लगेचच हे आंदोलन स्थगित करण्यात आले. (Contract workers protest outside KDMC’s Khambalpada depot; Protest suspended after Dipesh Mhatre’s mediation)

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात यापूर्वी काम करणाऱ्या सेक्युअर 1 कंपनीच्या कंत्राटी कामगारांकडून स्वच्छता आणि कचरा संकलनाचे काम केले जायचे. मात्र केडीएमसी प्रशासनाने आता महानगरपालिकेच्या 7 प्रभागांमधील कचरा संकलन आणि वाहतूकीचे काम सुमित एल्कोप्लास्ट या खासगी संस्थेला दिले आहे. त्यामुळे या नव्या संस्थेमध्ये कामावर घेण्याची मागणी या कामगारांकडून गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने केली जात आहे. मात्र त्याला अद्याप मुहूर्त सापडत नसल्याचे सांगत या कामगारांनी केडीएमसीच्या खंबाळपाडा वाहन डेपोबाहेर आज सकाळी 6 वाजल्यापासून काम बंद आंदोलन सुरू केले. ज्यामुळे याठिकाणी असलेल्या कचरागाड्या बाहेर पडू न शकल्याने कल्याण पूर्व आणि आसपासच्या परिसरातील कचरा संकलननाच्या कामावर काही काळ परिणाम झाला होता.

दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमूख दिपेश म्हात्रे, कल्याण जिल्हा संघटक तात्या माने यांनी आंदोलनस्थळी भेट देत केडीएमसी अधिकारी आणि कंपनी व्यवस्थापनाच्या प्रमूख प्रतिनिधींशी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ज्यामध्ये येत्या 15 ऑगस्टपर्यंत उर्वरित जागांवर या कर्मचाऱ्यांना घेण्याची कार्यवाही पूर्ण करणार, एकाही कर्मचाऱ्याला कामावर घेण्यासाठी जी व्यक्ती पैशाची मागणी करत असेल त्यावर कायदेशीर कारवाई करणार आणि पूर्वीच्या कंत्राटदाराकडून थकलेला पगार लवकरात लवकर देण्याची कार्यवाही करणार अशा प्रमुख मुद्द्यांवर केडीएमसी उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी दिपेश म्हात्रे यांना दिले. तसेच कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आम्ही अजिबात पाठीशी घालणार नाही त्यांच्यावर कंपनी व्यवस्थापनाने योग्य ती कारवाई कारवाई असेही दिपेश म्हात्रे यांनी यावेळी सांगितले. तर या सर्व निर्णयाची माहिती म्हात्रे यांनी संबंधित कर्मचाऱ्यांन दिल्यानंतर लगेचच हे आंदोलन थांबवण्यात आले. आणि केडीएमसीच्या कचरा संकलन गाड्या डेपोतून बाहेर पडल्या.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा