
डोंबिवली दि.6 डिसेंबर :
आपण महायुतीचा कार्यकर्ता असून कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेवर महापौर महायुतीचाच कसा बसेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगत कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महायुतीमध्ये सुरू असलेल्या नाराजीनाट्यावर पडदा टाकला. तसेच आपण सुरुवातीपासून विकासाचे राजकारण करण्याला प्राधान्य दिले असून यापुढेही आपला तोच दृष्टिकोन असेल अशा शब्दांत खा. शिंदे यांनी आपली पुढची दिशाही स्पष्ट केली. तर यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना खा.डॉ. शिंदे यांचा काहीसा हटके असा शायराना अंदाज दिसून आला. ज्यामध्ये त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाचे वर्णन करतानाच अप्रत्यक्षपणे राजकीय विरोधकांनाही टोला लगावला. ज्याला उपस्थितांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
(Development-Oriented Politics Is Our Priority; Mahayuti Will Retain the Mayor’s Post in Kalyan–Dombivli Municipal Corporation – MP Dr. Shrikant Shinde)
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी डोंबिवली येथील वै.ह.भ.प. संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलाच्या पुनर्विकासाच्या कामाचे आणि सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचे नूतनीकरणाच्या कामाचे भूमिपूजन पार पडले. सुमारे १८० कोटी रुपयांच्या निधीतून क्रीडा संकुलाच्या टप्पा – १ ची उभारणी करण्यात येणार आहे. तर १५ कोटी रुपयांच्या निधीतून सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचे नूतनीकरणाच्या पहिल्या टप्प्याची उभारणी करण्यात येणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही कामे आज मार्गी लागत आहेत. याचसमवेत क्रीडा संकुलाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या प्रेरणा वॉर मेमोरिअलचे उदघाटन यावेळी करण्यात आले. डोंबिवली येथील वै.ह.भ.प. संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडांगणात हा कार्यक्रम पार पडला.
मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांनी धुरा सांभाळल्यानंतर कल्याण–डोंबिवलीमध्ये अभूतपूर्व निधी येऊ लागला. तर 2014 पूर्वीची आणि आजची परिस्थिती यात जमीन–अस्मानाचा फरक पडला आहे. “2014 मध्ये तुम्ही मला खासदार म्हणून निवडून दिले. पूर्वी खासदारांची भूमिका रेल्वे, MTNL, BSNLपुरती मर्यादित होती. आज लोक आम्हाला कचरा उचलण्याच्या कामासाठीही फोन करतात. लोकांसाठी कोणतेही काम लहान नसते,”असेही खा. डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले.
डॉ. शिंदे यांनी आपल्या मतदारसंघातील प्रमुख प्रकल्पांची यादी वाचताना सांगितले की
कल्याण–शीळ रस्त्याचे सहापदरीकरण
बाधित शेतकऱ्यांना प्रलंबित आर्थिक मोबदला देण्याची प्रक्रिया
मुंबईच्या वेस्टर्न एक्स्प्रेस वेपेक्षा चर्चेत राहणारा **कल्याण–शीळ मार्ग
मेट्रोसह डबलडेकर उड्डाणपूल
पत्रीपूल काम पूर्ण
रेल्वेच्या 5–6 नव्या लाईन्स
अंबरनाथ–बदलापूरपर्यंत मेट्रोचे जाळे
मतदारसंघात 360 कोटींचा अंतर्गत रस्त्यांचा निधी
27 गावांतील जलयोजना
आंतरराष्ट्रीय दर्जाचे संत सावळाराम महाराज क्रीडा संकुल –
कल्याण–डोंबिवली कॅन्सर हॉस्पिटल प्रकल्प
7 ते 8 हजार कोटींची विकासकामे शहरात प्रगतीपथावर
“टीकेला उत्तर न देता विकासावर लक्ष केंद्रित ”…
खासदार म्हणून विकासाभिमुख काम करत असताना विरोधकांनी आपल्यावर अनेकदा टीका केली, अडथळे निर्माण केले, खड्डे खोदले. पण आम्ही टीकेला प्रत्युत्तर देण्यात वेळ घालवला नाही. विकासकामे थांबवली नाहीत. तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामुळेच इतका मोठा निधी कल्याण–डोंबिवलीला मिळाल्याची प्रांजळ कबुलीही त्यांनी यावेळी दिली.
याचबरोबर, अलीकडील निवडणुकांमध्ये लोकांनी विकासाला मत दिल्यामुळेच राजेश मोरे मोठ्या मतांनी निवडून आले असेही त्यांनी नमूद केले. तर “राजकारण कितीही असलं तरी कल्याण–डोंबिवलीचे भवितव्य घडवायचे असेल तर विकासाला मत दिलेच पाहिजे असे आवाहनही खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपस्थितांना केले.


























