Home ठळक बातम्या कल्याण पश्चिमेतील मतदार यादीत मोठ्या संख्येने दुबार मतदार, यादी बिनचूक होईपर्यंत निवडणूक...

कल्याण पश्चिमेतील मतदार यादीत मोठ्या संख्येने दुबार मतदार, यादी बिनचूक होईपर्यंत निवडणूक घेऊ नका – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी

दुबार मतदारांमध्ये कोणाचे तरी षडयंत्र असल्याचा माजी आमदार नरेंद्र पवार यांचा संशय

कल्याण दि.6 डिसेंबर :
मतदारयादी आणि त्यातील दुबार मतदारांचा मुद्दा काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीये. कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमेतील एका पॅनेलमध्ये तब्बल 1800 दुबार मतदार असल्याचे सांगत ही सर्व एका विशिष्ट समाजाचे मतदार आहेत. ते पाहता मतदार यादी बिनचूक होईपर्यंत कल्याण डोंबिवलीतील निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी कल्याण पश्चिमेतील भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली आहे. तसेच मतदार यादीतील दुबार मतदार काढून ती अद्ययावत करूनही इतक्या मोठ्या संख्येने दुबार मतदारांची नावे असण्यामागे काही षडयंत्र आहे का असा संशयही भाजपने व्यक्त केला आहे. (“Do Not Conduct Elections Until the Kalyan (West) Voter List Is Error-Free; Large Number of Duplicate Voters Found”)

निवडणुका जाहीर झाल्यापासून मतदार यादी आणि त्यातील दुबार मतदारांच्या नावावरून निवडणूक आयोग सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्यात आता येत्या काही दिवसांत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असून त्यापूर्वीच भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कल्याण पश्चिमेतील मतदार यादीतील दुबार मतदारांचा मुद्दा उपस्थित केला आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून एक अधिसूचना जाहीर करून मतदार यादीतील 80 हजार दुबार मतदारांची नावे काढून टाकल्याचे जाहीर केले आहे. मात्र कल्याण पश्चिमेतील पॅनल क्रमांक 1 असो, 5 असो की पॅनेल क्रमांक 7, अशा विविध प्रभागांमध्ये मतदार यादीमध्ये सुमारे 1 हजारांपेक्षा अधिक दुबार मतदार आढळून आले आहेत. आणि विशेष म्हणजे हे सर्व मतदार एकाच विशिष्ट समाजाशी संबंधित असल्याचे सांगत जोपर्यंत मतदार यादी बिनचूक होत नाही तोपर्यंत कल्याण डोंबिवलीतील निवडणुका न घेण्याची मागणीही भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी केली आहे.

तर निवडणूक आयोगाकडे इतकी स्वतंत्र यंत्रणा असतानाही इतक्या मोठ्या संख्येने मतदार यादीमध्ये घोळ कसे काय निर्माण झाले आहेत? निवडणूक आयोगाने यासाठी हरकती घेण्यासाठी आणि त्यात दुरुस्ती करून यादी बिनचूक करण्यासाठी वेळ वाढवून देण्याची आग्रही मागणीही माजी आमदार नरेंद्र पवार यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. तर या याद्यांधील घोळ दुरुस्त करण्यासाठी वेळ पडल्यास आम्ही न्यायालयातही दाद मागण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी मतदार यादी आणि त्यातील दुबार मतदारांबाबत केलेले गंभीर आरोप पाहता त्याकडे निवडणूक आयोग आता काय निर्णय घेते हे लवकरच स्पष्ट होईल.

यावेळी

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा