
डोंबिवली दि. 28 मे :
कल्याण शिळ मार्गावरील पलावा येथील वाहतूक कोंडी फोडण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या काटई उड्डाणपुलाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले असून पावसामुळे या कामात व्यत्यय येत आहे. मात्र तरीही जून अखेरपर्यंत हा पूल वाहतुकीला खुला करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु असल्याची माहिती कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी दिली.
आमदार राजेश मोरे यांनी आज सकाळीच पुलाच्या कामाची पाहणी करत रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्याकडून कामाच्या पूर्णत्वाचा आढावा घेतला.
कल्याण शीळ मार्गावरील हा महत्त्वाकांक्षी उड्डाणपूल १ जून रोजी नागरिकांसाठी खुले करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र पावसामुळे कामात व्यत्यय आल्याने हे काम थोडेसे लांबल्याचे आमदार मोरे यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर आपण या पुलाच्या कामाची पाहणी केली असून पुलाचे काम कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर पूर्ण होऊन जून अखेरपर्यत सुरु करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी डोंबिवली शिवसेना शहर सचिव तथा विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष चव्हाण, स्वीय सहाय्यक सतीश मोडक, युवासेना पदाधिकारी रोहित म्हात्रे तसेच रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.