
कल्याणातील महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी झाली जाहीर सभा
कल्याण दि.13 जानेवारी :
नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत जनतेने आम्हालाच कौल दिला असून कोणीही एकत्र आले तरी महानगरपालिका निवडणुकीमध्येही जनता भाजप – शिवसेनेलाच निवडून देईल असा विश्वास राज्य सरकारमधील मंत्री आणि भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी कल्याणात व्यक्त केला. कल्याण पश्चिमेतील महायुतीचे उमेदवार विजया पोटे, संदीप गायकर, हेमलता पवार, शामल गायकर, पराग तेली आणि अमित धाक्रस यांच्या प्रचारासाठी परदेशी मैदानावर झालेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या. (Even If Everyone Comes Together, the People’s Mandate Will Go to the Shiv Sena–BJP Alliance: Minister Pankaja Munde Expresses Confidence)
कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडुकीत शिवसेना भाजप महायुतीचे 21उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचा धागा पकडत त्यांनी सांगितले की इतक्या मोठ्या संख्येने आपले नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूकही आम्हीच जिंकणार असून याबाबत कोणाच्या मनात काही शंका असू नये. राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे असून दोघांकडून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान देण्याचे काम केले आहे. ज्या भावांनी तुम्हाला हा सन्मान मिळवून दिला त्यांना तुम्ही विसरणार आहात का? असा प्रश्न उपस्थित करत केंद्र सरकार, राज्य सरकारप्रमाणे महानगरपालिकेतही भाजप शिवसेना महायुतीचेच सरकार निवडून येणार असल्याचे पंकजाताईनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी पंकजाताई मुंडे यांनी मोदी सरकारमार्फत तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांची यादीच यावेळी उपस्थितांसमोर वाचून दाखवली. तसेच कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी भाजप शिवसेना युतीचे उमेदवार विजया पोटे, संदीप गायकर, हेमलता पवार, शामल गायकर, पराग तेली आणि अमित धाक्रस यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले.
यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार, माजी नगरसेवक अरविंद पोटे, सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक मंगेश गायकर, प्रदेश भाजप महिला मोर्चाच्या प्रिया शर्मा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान या सभेनंतर वंजारी समाजाच्या वतीने महायुतीच्या सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंब्याचे पत्र यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून मंत्री पंकजाताई मुंडे यांना देण्यात आले.

























