
मन एकाग्र असल्यास कोणत्याही साधनेत यशप्राप्ती -प.पू. स्वामी स्वरूपानंद सरस्वती
कल्याण, दि. 4 एप्रिल :
“मन एकाग्र असेल तरच कोणतीही साधना यशस्वी होते,” असे प्रतिपादन प.पू. स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केले. वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी शुक्ल यजुर्वेदातील सुमारे २,००० मंत्रांचे निर्दोष मौखिक दंडक्रम पारायण करणारे वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांचा कल्याणात सत्कार करण्यात आला. येथील के. सी. गांधी शाळेच्या ऑडिटोरियममध्ये झालेल्या या भव्य सत्कार सोहळ्याला मोठ्या संख्येने कल्याणकर उपस्थित होते. सभागृहातील सर्व आसने भरून गेल्याने अनेकांनी उभे राहून किंवा पायऱ्यांवर बसून या कार्यक्रमाचा लाभ घेतला. (Flawless Oral Recital of 2,000 Yajurveda Mantras in Dandakrama;Vedic Scholar Devvrat Rekhe Honoured in Kalyan)
याज्ञवल्क्य संस्था, कल्याण. अखिल भारतीय ब्राह्मण संघ, कल्याण शहर, ब्राह्मण सभा, चित्पावन ब्राह्मण संघ, कऱ्हाडे ब्राह्मण संघ आणि देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ, कल्याण या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या समारंभात वेदमूर्ती देवव्रत रेगे यांना महावस्त्र, शाल, श्रीफळ, पुणेरी पगडी, मानपत्र आणि ₹ १ लाख ५१ हजारांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.
यावेळी स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी आपल्या भाषणात बुद्धीचा योग्य उपयोग आणि उपासनेचे महत्त्व स्पष्ट करत गायत्री उपासनेचे विशेष महत्त्व अधोरेखित केले. तसेच वेदमूर्ती देवव्रत यांच्या विक्रमाचे कौतुक करत उपस्थितांना एकाग्रतेच्या शक्तीवर भर देण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमात वेदमूर्ती महेश रेखे यांनी ‘दंडक्रम पारायण’ या कठीण परंपरेचे स्वरूप आणि महत्त्व समजावून सांगितले. त्यानंतर त्यांनी एका मंत्राचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
यावेळी पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी वैदिक परंपरा जपण्यासाठी दररोज किमान एक श्लोक म्हणण्याचे उपस्थितांना आवाहन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दांडेकर दाम्पत्यांनी भक्तिगीते सादर केली. तर ब्रह्मवृंदांनी मंगलाचरण मंत्र आणि शंखनादाने मान्यवराचे स्वागत केले. शांतीमंत्र पठणाने कार्यक्रमाचा समारोप झाला.
या कार्यक्रमाला याज्ञवल्क्य संस्था, विश्वस्त अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, विश्वस्त राजीव जोशी, विश्वस्त राधाकृष्ण पाठक, अखिल भारतीय ब्राह्मण संघ, कल्याण शहर, अध्यक्ष सारंग केळकर, ब्राह्मण सभा अध्यक्ष सी. ए. मुकुंद बापट, देऋब्रा संस्था, कल्याण अध्यक्ष चंद्रकांत पुणतांबेकर, कर्हाडे ब्राह्मण संघ, कल्याण अध्यक्ष श्रीधर देवस्थळी यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कल्याणकर मान्यवर उपस्थित होते.


























