
कल्याण दि.16 मे :
कल्याण शहरातील भारतीय जनता पक्षाच्या सर्वात जुन्या आणि कट्टर कार्यकर्त्यांपैकी एक अशी ओळख असलेल्या दिनेश तावडे यांचे आज सकाळी निधन झाले. नेहमीप्रमाणे भगवा तलाव येथे मॉर्निंग वॉक करत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलगे असा परिवार आहे. (Former Bharatiya Janata Party district president Dinesh Tawde passes away due to a severe heart attack)
दिनेश तावडे यांनी 1974 पासून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपल्या समाजकारण आणि राजकारणाला प्रारंभ केला. आपल्या कुशल नेतृत्व आणि संघटन कौशल्याच्या बळावर त्यांनी सामान्य कार्यकर्ता ते भाजपचे जिल्हाध्यक्ष अशी मोठी झेप घेतली. तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये स्वीकृत सदस्य, नगरसेवक आणि विरोधी पक्षनेता अशी पदही त्यांनी भूषवली. तर आणीबाणीच्या काळातही त्यांनी तितक्याच आत्मियतेने पक्षाचे काम केल्याची आठवण त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांनी करून दिली.
अशा जुन्या फळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्याच्या निधनामुळे भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.