
भारत सरकारच्या युवा-क्रीडा मंत्रालयाच्या सहकार्याने बी.के. बिर्ला कॉलेजतर्फे आयोजन
कल्याण दि.25 नोव्हेंबर :
भारत सरकारच्या युवा आणि क्रीडा मंत्रालयाच्या सहकार्याने बी.के. बिर्ला कॉलेज, कल्याणतर्फे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त २३ नोव्हेंबर २०२५ रोजी भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते झाले. (Grand March Organized in Kalyan on the Occasion of Sardar Vallabhbhai Patel’s 150th Birth Anniversary)
बी.के. बिरला कॉलेज (पश्चिम) येथून सुरू झालेली पदयात्रा इंदिरानगर, आयुक्त बंगला, कार्निक रोड आणि सहजानंद चौक मार्गे दुर्गाडी किल्ला व गणेश घाट परिसरात पोहोचली. बिरला कॉलेजच्या एनएसएस युनिट्सने युवा आणि क्रीडा मंत्रालय तसेच महाविद्यालय व्यवस्थापनाच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडला. कार्यक्रमाच्या सुरळीत आयोजनासाठी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश चितलांगे यांचे विशेष सहकार्य लाभले.
कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बद्लापूर येथील १८ महाविद्यालयांमधील ७५० विद्यार्थी, एनएसएस स्वयंसेवक, एनसीसी कॅडेट्स, शिक्षक व पालकांनी पदयात्रेत उत्साहाने सहभाग घेतला.
यातील विशेष आकर्षण ठरले—
• विविध महान व्यक्तिमत्त्वांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांची रथयात्रा
• लेझीम पथकाचे सादरीकरण
• नशामुक्त भारत, सायबर सुरक्षा आणि ‘एकता- विविधता’ या विषयांवरील प्रभावी पथनाट्य
विद्यार्थ्यांना संबोधित करताना आयुक्त गोयल यांनी राष्ट्रनिर्माणामध्ये युवकांची भूमिका अधोरेखित केली. ही पदयात्रा केवळ चालण्यापुरती मर्यादित नसून विचारांचे मंथन, शिकण्याची संधी आणि सरदार पटेल यांच्या मूल्यांना दैनंदिन जीवनात अंगीकारण्याचा मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी बी.के. बिरला कॉलेजने युवक सक्षमीकरण आणि सामाजिक बांधिलकीच्या क्षेत्रात केलेल्या कार्याचे कौतुक केले.
या पदयात्रेची सुरुवात “आत्मनिर्भर भारत” या घोषणेने झाली. या प्रसंगी बिर्ला महाविद्यालयाचे संचालक डॉ. नरेश चंद्र,.संजय जाधव (उपआयुक्त, केडीएमसी),विजय सरकटे (शिक्षण विभाग, केडीएमसी), प्राचार्य डॉ. अविनाश पाटील, रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बिपिनचंद्र वाडेकर, डॉ. महेश भिवंडीकर (अध्यक्ष, अचीव्हर्स कॉलेज), डॉ. हरीश दुबे (उपप्राचार्य, बीकेबीसीके), जीवन विचारे (NSS ठाणे जिल्हा समन्वयक) आणि मनीषा शर्मा (माय भारत उपक्रम, ठाणे जिल्हा कार्यक्रम अधिकारी) उपस्थित होते. पदयात्रा समन्वयक डॉ. संदेश जयभाये यांनी या उपक्रमाचे उद्दिष्ट आणि महत्त्व स्पष्ट करताना, ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाचा उल्लेख केला.
कार्यक्रमाचा समारोप नशामुक्त भारत शपथ देऊन झाला. संपूर्ण आयोजन बी.के. बिरला कॉलेजच्या एनएसएस कार्यक्रम अधिकाऱ्यांचे — डॉ. संदेश जयभाये, राकेश भोईर, डॉ. सोनाली राजपूत आणि कोमल तिवारी — तसेच एनएसएस स्वयंसेवकांच्या संपूर्ण टीमवर्कमुळे यशस्वी झाले.
























