
कल्याण डोंबिवलीतील 200 सायकलपटू झाले सहभागी
कल्याण डोंबिवली दि.10 ऑगस्ट :
“हर घर तिरंगा – घर घर तिरंगा” संकल्पनेअंतर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विद्युत विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. कल्याण डोंबिवलीतील विविध सायकलिस्ट ग्रुपचे 200 हून अधिक सदस्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. (Har ghar tiranga; Spontaneous response to the cycle rally organized by the KDMC Electricity Department.)
केंद्र सरकारच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षापासून हर घर तिरंगा – घर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. तर देशातील जनतेला आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी ‘फिट इंडिया” चळवळही शासनातर्फे सुरू करण्यात आली आहे. या दोन्ही संकल्पनांवर आधारित केडीएमसी विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता तथा नोडल अधिकारी सायकल उपक्रम, प्रशांत भागवत यांच्या माध्यमातून कल्याण आणि डोंबिवलीत दोन स्वतंत्र सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये कल्याण सायकलिस्ट ग्रुप, डोंबिवली सायकलिस्ट ग्रुप, बाईकपोर्ट सायकलिस्ट ग्रुप, हिरकणी महिला सायकलिस्ट ग्रुप, वीरांगना सायकल प्रेमी ग्रुप डोंबिवली, एव्हरग्रीन सायकल प्रेमी ग्रुप डोंबिवली, पलावा सायकलिस्ट ग्रुप आदी प्रमूख संस्थांचे सदस्य सहभागी झाले होते.
या सायकल रॅलीच्या माध्यमातून नुकत्याच झालेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय जवानांनी गाजवलेल्या शौर्याला मानवंदना देण्यासह लोकांमध्ये आरोग्याबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यात आल्याचे केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी सांगितले. तर आरोग्यासोबतच पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी महापालिकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आठवड्यातून एक दिवस सायकलने कार्यालयात येणे बंधनकारक करण्याचा विचार असल्याचेही आयुक्त गोयल यांनी सांगितले.
या सायकल रॅलीचे उद्घाटन आयुक्त अभिनव गोयल, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, उपआयुक्त संजय जाधव, समीर भूमकर, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन धावपटू दिलीप घाडगे, केडीएमसीचे ब्रँड ॲम्बेसेडर डॉ. प्रशांत पाटील, जनी- मनि घनश्याम नवांगुळ, राठोड, सहाय्यक आयुक्त उमेश यमगर, धनंजय थोरात यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.