Home क्राइम वॉच केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीत पोलिसांचा तगडा फौजफाटा ; ड्रोन, एसआरपीएफ आणि...

केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीत पोलिसांचा तगडा फौजफाटा ; ड्रोन, एसआरपीएफ आणि बरंच काही

कल्याण दि.5 जानेवारी :
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर परिमंडळ–३, कल्याण अंतर्गत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने व्यापक आणि कडेकोट बंदोबस्ताची अंमलबजावणी केली आहे. कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी विविध प्रतिबंधात्मक कारवाईचे उपाय राबविण्यात आले आहेत. (Heavy Police Deployment in Kalyan-Dombivli Ahead of KDMC Elections; Drones, SRPF and Enhanced Security Measures in Place)

कल्याण परिमंडळ–३ अंतर्गत एकूण ३१ प्रभागांमध्ये ३४४ मतदान केंद्रे आणि १ हजार ४५७ मतदान बूथ निश्चित करण्यात आले आहेत. याठिकाणी मतदानाच्या दिवशी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, VST, FST आणि 9 SST पथके तैनात करण्यात आली आहेत.

पोलीस ठाण्यांतर्गत ४९ विशेष पोलीस सेक्टर तयार
निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ९ SST ठिकाणे निश्चित करण्यात आली असून, त्यामध्ये महात्मा फुले चौक, बाजारपेठ, कोळसेवाडी, खडकपाडा, डोंबिवली, विष्णुनगर, मानपाडा आणि टिळकनगर परिसराचा समावेश आहे. त्यामध्ये एकूण ४९ पोलीस सेक्टर तयार करण्यात आले असून त्यासाठी अतिरिक्त पोलीस अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत.

शस्त्र जमा आणि प्रतिबंधक कारवाई
निवडणूक काळात सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात शस्त्र जमा करण्यात आली आहेत. बँक आणि इतर संस्थांकडील शस्त्रांसह एकूण १,३०१ शस्त्रांपैकी १,११० शस्त्र जमा करण्यात आली असून, उर्वरित शस्त्रांवर देखरेख ठेवण्यात आली आहे.तसेच मपोका कलम ५५, ५६, ५७, MCOCA, MPDA तसेच विविध भा.ना.सु.सं. कलमांअंतर्गत एकूण २,५२७ प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या आहेत.

९ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त…
अवैध दारू, अमली पदार्थ, शस्त्रे यांच्याविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. यामध्ये गावठी कट्टे, काडतुसे, दारू, गांजा तसेच SST कारवाईदरम्यान ९ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे.

कोम्बिंग ऑपरेशन आणि ड्रोन पाळत…
निवडणूक काळात ४ कोम्बिंग ऑपरेशन, ९ रूट मार्च आणि ७ दंगा नियंत्रण योजना राबविण्यात आल्या आहेत. तसेच संपूर्ण परिमंडळात २४ ड्रोनच्या माध्यमातून मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

EVM सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था
मतदान यंत्रांच्या सुरक्षेसाठी मुख्य स्ट्रॉंगरूम १ आणि आरओ स्तरावरील ९ स्ट्रॉंगरूम, अशा एकूण १० स्ट्रॉंगरूम सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

पोलीस प्रशासनाने नागरिकांना निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन केले असून, कोणतीही अनुचित घटना घडल्यास तात्काळ पोलीस यंत्रणेशी संपर्क साधण्याचे आवाहन डी सी पी अतुल झेंडे यांनी केले असून निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा