
संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांनी प्रसिद्धी पत्रक काढत दिली माहिती
कल्याण दि.16 मे :
पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर भारताच्या लष्करी कारवाईदरम्यान पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्की, अझर बैजान आणि चीनविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील रेडिओलॉजिस्ट डॉक्टरांची प्रमूख संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य रेडिओलॉजिस्ट असोसिएशननेही यापुढे तुर्की, अझरबैजानसह चीनमधील पर्यटनावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांनी यासंदर्भात पत्रक काढून ही माहिती दिली आहे. (Help Pakistan during tension; Maharashtra Radiology Association also boycotts tourism to China along with Turkey, Azerbaijan)
गेल्या महिन्यात 22 एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथील पर्यटकांवर अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला. ज्याच्या प्रत्युत्तरादाखल भारतीय लष्कराकडून ऑपरेशन सिंदूर ही मोहीम राबविण्यात आली. ज्यामध्ये भारतीय लष्कराने पाकिस्तानी लष्कराचे अक्षरशः कंबरडे मोडून काढले. यावेळी झालेल्या युद्धसदृश्य परिस्थितीदरम्यान तुर्कीने पाकिस्तानला लष्करी सामग्री पाठवत आपला पाठिंबा जाहीर केल्याचे समोर आले आहे. तुर्की सोबतच अझर बैजान आणि चीननेही पाकिस्तानला आपला पाठिंबा जाहीर केल्याने भारतीय नागरिकांमध्ये या तिन्ही देशांविरोधात संतापाची लाट उसळली आहे. विशेषतः सोशल मीडियावर त्याचे तीव्र पडसाद उमटत असून या तिन्ही देशांवरील पर्यटनावर बहिष्कार घालण्याचे आवाहन सर्व भारतीयांना करण्यात येत आहे. आणि या आवाहनाला भारतीय पर्यटकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून ट्रॅव्हल कंपनीसह हजारो पर्यटकांनी या देशातील आपले बुकिंग रद्द केले आहेत.
यामध्ये आता महाराष्ट्रातील डॉक्टरांची एक प्रमुख संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य रेडिओलॉजी संघटनेनेही आपली भूमिका स्पष्ट करत या तिन्ही देशांवरील पर्यटनावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.
आताची वेळ ही आपल्या देशासोबत आणि देशाच्या लष्कराच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहण्याची आहे. या दृष्टिकोनातूनच आमच्या संघटनेने हा निर्णय घेतला असून इतर नागरिकांनीही या तिन्ही देशांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केल्याची माहिती महाराष्ट्र रेडिओलॉजी संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, सचिव डॉ. सुशांत भदाणे, खजिनदार डॉ. संदीप महाजन यांनी केले आहे.