Home ठळक बातम्या निरक्षर असूनही विचारांनी मात्र महान: वच्छला लिखार यांचा ९१ व्या वर्षी देहदानातून...

निरक्षर असूनही विचारांनी मात्र महान: वच्छला लिखार यांचा ९१ व्या वर्षी देहदानातून समाजासमोर आदर्श

कल्याण दि.2 एप्रिल :
आपल्या मराठीत एक जुनी म्हण आहे “मरावे परी कीर्तीरूपे उरावे”. आणि या म्हणीला साजेशी अशीच एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. कोणतेही औपचारिक शिक्षण नसतानाही उच्च विचार जपणाऱ्या वच्छला चंद्रभान लिखार (वय ९१) यांनी मृत्यूनंतर देहदान करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. (Illiterate Yet Noble in Thought: 91-Year-Old Vachchhala Likhar Sets an Example Through Body Donation”)

ग्रामीण भागात आपले बहुतांश आयुष्य व्यतीत केलेल्या वच्छला लिखार यांना वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या त्यांच्या भाचीमार्फत देहदानाचे महत्त्व समजले. त्यानंतर त्यांनी कोणताही विलंब न करता देहदानाचा निर्णय घेतला. “माझ्या मृत्यूनंतर माझ्या शरीराचा उपयोग डॉक्टर होणाऱ्या विद्यार्थ्यांना झाला, तर त्यापेक्षा मोठे पुण्य नाही,” असा त्यांचा ठाम विश्वास होता. आणि त्यानुसार त्यांनी सुमारे पाच वर्षांपूर्वीच कुटुंबियांच्या मदतीने देहदानाचा अर्ज भरून ठेवला होता.

दरम्यान, २८ मार्च २०२६ रोजी त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांना कोणताही आजार नव्हता त्यामुळे औषधाच्या गोळीचा प्रश्नच नाही. नेहमीप्रमाणे दैनंदिन दिनक्रम पूर्ण करून दुपारी जेवताना त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती त्यांचे पुत्र आणि कल्याणच्या नामांकित बालक मंदिर संस्थेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक विलास लिखार यांनी दिली.

आईच्या अंतिम इच्छेनुसार, पारंपरिक अंत्यसंस्कार न करता त्यांचे पार्थिव नागपूर येथील शासकीय रुग्णालयाकडे सुपूर्द करण्यात आले. तर अंत्यविधीबाबत विचारणा करणाऱ्या नातेवाईकांनाही वच्छला लिखार यांच्या देहदानाचा निर्णय समजताच कौतुक आणि अभिमानाची भावना व्यक्त करण्यात आली.

तर देहदानामुळे पारंपरिक अस्थी उपलब्ध नसल्याने, रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या केस आणि नखांच्या माध्यमातून कुटुंबीयांनी प्रतीकात्मक विधी पार पाडले. हे विधी पवनी येथील ‘विदर्भ काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नदीकाठी करण्यात आले. याशिवाय, ‘तेराव्याचा खर्चही वृद्धाश्रमाला दान करावा’ ही वच्छला लिखार यांची इच्छादेखील कुटुंबीय पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

औपचारिक शिक्षण नसतानाही समाजाला दिशा देणारा इतका मोठा निर्णय घेणाऱ्या वच्छला लिखार यांचे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबाचा आधारस्तंभ हरपला असला, तरी त्यांच्या विचारांचा वारसा मात्र समाजात दीर्घकाळ दीपस्तंभाप्रमाणे प्रेरणा देत राहील.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा