Home ठळक बातम्या महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या “त्या” अधिसूचनेविरोधात आयएमए कल्याणही आक्रमक; तहसिलदारांना निवेदन सादर

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या “त्या” अधिसूचनेविरोधात आयएमए कल्याणही आक्रमक; तहसिलदारांना निवेदन सादर

कल्याण दि.8 जुलै :
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने सीसीएमपी कोर्स पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना नोंदणीची परवानगी देण्याच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य आयएमए अर्थातच इंडीयन मेडीकल असोसिएशन आक्रमक झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कल्याण आयएमएकडून हा निर्णय रद्द करण्यासाठी कल्याण तहसीलदार कार्यालयाला आज निवेदन देण्यात आले. येत्या 11 जुलैला 24 तास आरोग्यसेवा बंद ठेवण्यासह 19 जुलैला मुंबईत भव्य रॅलीही काढली जाणार असल्याचे आयएमएने स्पष्ट केले आहे. (IMA Kalyan is also aggressive against “that” notification of Maharashtra Medical Council; Submits a statement to the Tehsildar)

कल्याण आयएमए अध्यक्ष डॉ. सुरेखा ईटकर, नियोजित अध्यक्ष डॉ. राजेंद्र लावणकर, डॉ. अश्विन कक्कर, डॉ. विकास सुरंजे, डॉ. स्नेहलता कुरीस, डॉ.स्मिता महाजन, डॉ. राजन माने, डॉ. विद्या ठाकूर आदींच्या शिष्टमंडळाचा त्यात समावेश होता.

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने (MMC) ३० जून २०२५ रोजी जारी केलेल्या वादग्रस्त अधिसूचनेचा आय एम इ महाराष्ट्राने तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. या अधिसूचनेनुसार, केवळ एका वर्षाचा मॉडर्न फार्मसीचा सर्टिफिकेट कोर्स (CCMP) पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांना महाराष्ट्र मेडीकल कौन्सिलमध्ये नोंदणीची परवानगी देण्यात आली आहे. आयएमएच्या मते हा निर्णय संपूर्ण आधुनिक वैद्यकीय शिक्षणव्यवस्थेचा आणि नैतिकतेचा अवमान करणारा असून त्याद्वारे रुग्णांच्या आरोग्याशी गंभीर धोका निर्माण होऊ शकतो असे डॉ. सुरेखा ईटकर यांनी सांगितले.

त्यासाठी आज संपूर्ण राज्यभरातील तहसीलदारांना आयएमएच्या संबंधित शाखांकडून निवेदन देण्यात आले असून या निर्णयाविरोधात तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच येत्या ११ जुलै रोजी २४ तासांची एकदिवसीय आरोग्य सेवा बंद ठेवण्यात येणार असून १९ जुलै रोजी मुंबईमध्ये भव्य रॅली काढली जाणार आहे. तर राज्य शासनाने ही अधिसूचना तात्काळ मागे न घेतल्यास लोकशाही मार्गाने संपूर्ण राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा