
नवी दिल्ली दि.6 मे:
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकिसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या शेकडो इच्छुक आणि प्रस्थापित उमेदवारांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यांत घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे रखडलेल्या राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. (Important information regarding municipal elections; Supreme Court directs to hold local body elections in the state within the next four months)
यासंदर्भात आदेश देताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची अधिसूचना पुढील चार आठवड्यात निघाली पाहिजे, यानंतर चार महिन्यांत निवडणुकीची प्रक्रिया संपन्न झाली पाहिजे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिले आहेत. त्यांमुळे गेल्या काही वर्षांपासून महापालिका निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेल्या इच्छुकांचा जीव भांड्यात पडला आहे.
दरम्यान मुदत संपलेल्या राज्यातील महानगरपालिकांमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचाही समावेश आहे. 2015 मध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाली होती. त्यानंतर 2020 संपता संपता आलेल्या कोवीड महामारीने सर्वच व्यवहार ठप्प झाले. परिणामी 2020 ते 2025 या 5 वर्षांच्या काळातील नगरसेवकपदाची एक टर्मइतका कालावधीही संपुष्टात आला. आणि अखेर आज सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग आज मोकळा केला आहे.