
कल्याण दि.26 मे :
अतिवृष्टीमुळे उल्हास नदीच्या दुसऱ्या काठावर अडकून पडलेल्या तिघांना स्थानिक पिता पुत्राने स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले. गुरुनाथ हनुमंत पवार असे वडिलांचे तर रोहन असे या पिता पुत्राचे नाव असून या दोघांनी दाखवलेल्या या धाडसाचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. या दोघांनी दाखवलेल्या या जिगरबाज कामगिरीमुळे कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळ यांच्याकडून दोघांचाही गौरव करत कौतुकाची थाप देण्यात आली. (Kalyan Tehsildar praises father and son for saving three people by risking their own lives)
रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अवघ्या काही तासांतच उल्हास नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली. परिणामी कल्याण तालुक्यातील मोहीली गावाजवळून वाहणाऱ्या उल्हास नदीचे पात्रही चांगलेच विस्तारले. त्यामुळे या नदीकिनारी तयार झालेल्या बेटावर देउ मंगल गायकर (वय वर्ष ५५), शंकर गठल्या पाटील (वय वर्ष-५५) आणि सावळाराम गोप्या वाघे (वय वर्षे ६०) हे तिघे जण सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आपली गुरे चरण्यासाठी याठिकाणी गेले होते. मात्र रायगडमधील मुसळदार पाऊसामुळे नदीचे पाणी अचानक वाढले आणि हे तिघेही जण त्याठिकाणी अडकून पडले. तर नदीचे पाणी वाढल्याचा अंदाज येताच त्यांनी आपली गुरे दुस-या किनारी सुखरुप पोहचवली. परंतु त्यांना स्वतःला पाण्याच्या प्रचंड प्रवाहातून बाहेर येणे शक्य झाले नाही.
दरम्यान याठिकाणी हे 3 इसम अडकल्याची माहीती संतोष शिगोळे या सामाजीक कार्यकर्त्याने दुरध्वनीद्वारे तालुका प्रशासनाला कळवली. त्यानंतर टिटवाळा मंडळ अधिकारी टिटवाळा चेतन पष्टे, मांडा ग्राम महसूल अधिकारी किरण कदम आणि अग्नीशमन दलाचे अधिकारी तडवी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र उल्हास नदीचा प्रवाह प्रचंड असल्याने बचावकार्य करणे कठीण झाले होते.
अशावेळी मौजे गाळेगांव येथील स्थानिक रहीवासी गुरुनाथ हनुमंत पवार आणि त्यांचा मुलगा रोहन पवार यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपली पारंपरिक मासेमारीची होडी थेट नदीपात्रात वळवली. एकीकडे विस्तारलेले नदीपात्र, त्यातील पाण्याचा प्रचंड प्रवाह. मात्र आपल्या जिद्दीच्या आणि अनुभवाच्या जोरावर या दोघांनीही जीवाची बाजी लावत समोरचा किनारा गाठला. तसा अडकून पडलेल्या तिघांचाही जीव भांड्यात पडला.
आणि आपल्या पारंपरिक होडीद्वारे पवार पिता पुत्राने या तिन्ही व्यक्तींना नदीच्या प्रचंड प्रवाहातून सुखरुप बाहेर काढले.
या धाडसी कार्याबददल कल्याण तहसीलदार सचिन शेजाळ यांच्याकडून गुरुनाथ हनुमंत पवार आणि त्यांचा मुलगा रोहन पवार यांचा आज सायंकाळी तहसील कार्यालयात शाल,श्रीफळ आणि रोख रक्कम देऊन सत्कार केला.