
टिटवाळा दि.14 जुलै :
कल्याण डोंबिवली परिसरात वाढलेल्या साथ आजारांच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून ॲक्शन मोडवर येत उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या ‘अ’ प्रभागात अतिरिक्त आयुक्तांच्या देखरेखीखाली विशेष मोहीम राबविण्यात आली. ज्यामध्ये जंतुनाशक फवारणी, कचरा संकलन, स्वच्छता उपक्रम आदी गोष्टींचा समावेश होता. (KDMC on action mode in the backdrop of increasing epidemic; Special campaign in ‘A’ ward in the presence of Additional Commissioner)
वडवली,अटाळी, आंबिवली परिसरात प्रत्यक्ष फिरुन पाहणी…
पावसाळी परिस्थितीत उद्भवणा-या साथरोग निर्मुलनाबाबत केल्या जाणा-या उपाययोजनांची प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या दृष्टीकोनातून महापालिकेचे अति.आयुक्त हर्षल गायकवाड यांनी आज सकाळी ८ वाजल्यापासून १/अ प्रभागातील अधिकारी कर्मचा-यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये प्रभागनिहाय कृती आराखड्याप्रमाणे कामे सुरु आहेत की नाही याची खातरजमा करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त गायकवाड यांनी वडवली,अटाळी, आंबिवली परिसरात प्रत्यक्ष फिरुन पाहणी केली.
डासआळी निर्माण होऊ नये म्हणून दक्षता घेण्याचे आवाहन…
या परिसरात घराबाहेर असलेल्या पाण्याच्या ड्रमची स्वत: तपासणी करुन रिकामे करत जंतुनाशक फवारणी करुन घेण्यात आली. इतकेच नाही तर त्यांनी संशयित डेंग्यु रुग्ण असलेल्या घर,आजूबाजूच्या परिसराची पाहणी करून संबंधितांना योग्य त्या सूचनाही दिल्या. सोसायटयांच्या आवारात पावसाचे पाणी साठणार नाही याची दक्षता घेणेबाबत, सोसायटयांमधील घरात असलेल्या कुंड्या, मनीप्लॅन्ट आणि तत्सम ठिकाणी साचलेल्या पाण्यात डासआळी निर्माण होऊ नये म्हणून दक्षता घेण्याचे आवाहनही गायकवाड यांनी यावेळी केले.
या पाहणी दौ-यावेळी १/अ प्रभागाचे सहा.आयुक्त प्रमोद पाटील, स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरिक्षक उपस्थित होते.