
केडीएमसीच्या 61 शाळांमध्ये झाली पायाभूत चाचणीला सुरुवात
कल्याण डोंबिवली दि.1 जुलै :
आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये महापालिका शाळेतील विद्यार्थीही इतरांच्या तुलनेत कुठे मागे राहू नये यासाठी महापालिकेने थेट मुळापासून प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून केडीएमसीच्या सर्वच्या सर्व 61 शाळांमध्ये पायाभूत चाचणी परीक्षा घेण्यात आली. दर महिन्याला ही पायाभूत चाचणी होणार असून त्याद्वारे विद्यार्थ्यांचा बौध्दीक स्तर वाढवण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या अभिनव उपक्रमाचे शालेय शिक्षकांसह नागरिकांनीही कौतुक केले आहे. (KDMC’s innovative concept to increase the intellectual level of students; Basic testing begins)
महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांचे निर्देशानुसार शिक्षण विभागाने महापालिकेच्या शाळांचा पूर्णत: कायापालट करण्यासाठी कंबर कसली आहे. यावर्षी शाळा प्रवेशादिवशीच विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तके पुरविण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे गणवेश, बुट, दफ्तरे इ. आवश्यक सुविधाही वर्षाचे सुरवातीला पुरविण्याचे नियोजन आहे. त्यापाठोपाठ आता, महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचा बौध्दीक स्तर वाढविण्यासाठी, त्यांची शैक्षणिक प्रगती पाहण्यासाठी महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या पायाभूत चाचणीस कालपासून प्रारंभ झाला.
त्यासाठी प्रत्येक शाळानिहाय पालक अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली असून या पालक अधिकाऱ्यांनी स्वत: शाळेत जावून या पायाभूत चाचणीची पाहणी केली. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी पालकत्व स्विकारलेल्या सिंडेकेट येथील शाळा क्र. 95/8 या ऊर्दु शाळेत, बारावे येथील शाळा क्र. 68 आणि बारदान गल्ली येथील ऊर्दु आणि मराठी शाळेला समक्ष भेट देवून या पायाभूत चाचणी परिक्षेची पाहणी केली. इतकेच नाही तर स्वत: खडू हातात घेवून यावेळी विद्यार्थ्यांची शिकवणीही घेतली.
महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांचा बौधिक स्तर वाढविण्याच्या दृष्टीकोनातून ही पायाभूत चाचणी घेतली जात असून यानंतर सर्व शिक्षकांसाठी शिक्षण परिषदेचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाचे उपआयुक्त संजय जाधव यांनी दिली. तसेच या शिक्षण परिषदेमध्ये विद्यार्थ्यांचा बौध्दीक स्तर वाढविण्याच्या दृष्टीकोनातून करायच्या विविध उपायांवरही ऊहापोह केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.