
काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली कल्याणात ठिय्या आंदोलन
कल्याण दि.11 ऑक्टोबर –
ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते मामा पगारे यांचा भाजप पदाधिकाऱ्यांनी साडी नेसवून केलेला अपमान ही केवळ एखाद्या व्यक्तीचा नव्हे तर संपूर्ण काँग्रेस पक्षाचा असून ही लोकशाही मूल्यांची अवहेलना आहे,अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज कल्याणात तीव्र संताप व्यक्त केला. “लोकशाहीचे हे वस्त्रहरण संविधानाच्या वस्त्राने वाचवूया,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. (Let’s save the stripping of democracy with the garment of the Constitution – Congress state president Harshvardhan Sapkal’s appeal for welfare)
मामा पगारे अपमानप्रकरणी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या पुढाकाराने कल्याण येथील डीसीपी – प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवत “संविधान वाचवा – लोकशाही वाचवा” अशा घोषणा दिल्या.
यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आंदोलनस्थळी उपस्थित होताच ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते मामा पगारे यांना थेट खांद्यावर उचलून सन्मान दिला. “हा मामा पगारे यांचा अपमान नाही, तर संपूर्ण काँग्रेस परिवाराचा आणि लोकशाही मूल्यांचा अपमान आहे. काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे,” असल्याचे सपकाळ म्हणाले.
भाजप पदाधिकाऱ्यांनी पगारे यांना साडी नेसवून केलेला अपमान आणि देशाच्या मुख्य न्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची मानसिकता सारखीच असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. “ही ठोकशाही काँग्रेस पक्ष अजिबात सहन करणार नाही. संविधानाच्या विरोधात जाणाऱ्या प्रत्येक कृतीविरोधात आम्ही सातत्याने लढा देऊ,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
सत्ताधाऱ्यांकडून संविधानाऐवजी ठोकशाही आणण्याचा प्रयत्न सुरू असून, काँग्रेस पक्ष हा देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा पक्ष आहे. “आम्ही केवळ सत्तेचे हस्तांतरण केले नाही, तर व्यवस्था परिवर्तनाचा हेतू ठेवून सत्ता चालवली. आम्ही लोकशाही आणि नागरिकांच्या स्वातंत्र्याचा सदैव आदर केला,” असेही सपकाळ यांनी सांगत मामा पगारे यांच्या अपमानप्रकरणी संबंधितांवर ऍट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.
तर याप्रसंगी हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते मामा पगारे यांचा ब्लेझर परिधान करून सन्मान करण्यात आला. तसेच त्यांना तथागत गौतम बुद्ध यांची मूर्ती आणि संविधानाची प्रतही भेट देण्यात आली.
दरम्यान, या आंदोलनानंतर प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य मुन्ना तिवारी, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी, ब्लॉक अध्यक्ष विमल ठक्कर, युवक काँग्रेसचे जपजित सिंग आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे यांना निवेदन देण्यात आले.